अबब ! चिमुरड्याच्या पोटातून निघाली देवीची मूर्ती
By admin | Published: August 20, 2016 11:43 AM2016-08-20T11:43:40+5:302016-08-20T11:54:34+5:30
कर्नाटकमधील रायपूरमध्ये डॉक्टरांनी एका 4 वर्षाच्या मुलाच्या पोटातून लक्ष्मी देवीची मूर्ती बाहेर काढली असल्याची अजब घटना घडली आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 20 - कर्नाटकमधील रायपूरमध्ये एक अजब घटना समोर आली आहे, ज्यामध्ये डॉक्टरांनी एका 4 वर्षाच्या मुलाच्या पोटातून लक्ष्मी देवीची मूर्ती बाहेर काढली आहे. विश्वास बसत नसेल मात्र हे खरं आहे. यात कोणतीही अंधश्रद्धा नसून या चिमुरड्याने ही मूर्ती गिळली होती. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुन ही मूर्ती बाहेर काढली.
देवीची ही मूर्ती या लहान मुलाला त्याच्या शेजा-यांनी गिफ्ट म्हणून दिली होती. शेजा-यांनी ही मूर्ती वाराणसीहून विकत आणली होती. या मुलाचे वडील शाळेत शिक्षक आहेत. 'ही मूर्ती पाच दिवसांपुर्वीच त्याला दिली होती. त्याला ती इतकी आवडायची की तो नेहमी तिला सोबत ठेवायचा. इतकंच नाही तर शाळेतही घेऊन जायचा', असं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे.
गुरुवारी आपल्या बहिणीसोबत खेळत असताना त्याने आपल्या आईकडे पोटात दुखत असल्याची तक्रार केली. आपल्या मुलाने मूर्ती गिळल्याचा संशय आल्यावर त्यांनी मूर्ती शोधण्यास सुरुवात केली. मूर्ती सापडली नाही तेव्हा त्याने ती गिळली असल्याची त्यांना खात्री पटली. त्यानंतर त्यांनी लगेच त्याला डॉक्टरकडे नेलं.
एक्स-रे काढल्यानंतर मुलाने 4 बाय 3 सेंमीची ही मूर्ती गिळल्याचं स्पष्ट झालं. मूर्ती पोटात फसली होती, मात्र सुदैवाने नाजूक ठिकाणी पोहोचलेली नव्हती. मूर्ती कशापासून बनलेली आहे याची माहिती नसल्याने डॉक्टरांना केमिकल्समुळे शरिरात विष पसरण्याची भीती वाटत होती. शेवटी त्यांनी मूर्ती बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. मुलगा लहान असल्याने त्यांनी सर्जरी न करता एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. जाळीचा वापर करत डॉक्टरांनी यशस्वीपणे मूर्ती बाहेर काढली.