अबब ! वकिलाकडे सापडलं 125 कोटींचं घबाड
By admin | Published: October 20, 2016 11:09 AM2016-10-20T11:09:14+5:302016-10-20T11:09:14+5:30
दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणा-या वकिलाकडे आढळलेली संपत्ती पाहून आयकर विभागाचे अधिकारीदेखील चक्रावले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणा-या वकिलाकडे आढळलेली संपत्ती पाहून आयकर विभागाचे अधिकारीदेखील चक्रावले आहेत. वकिलाच्या दक्षिण दिल्लीमधील निवासस्थानी मारण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 125 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे.
दिल्लीमध्ये 100 कोटींचा बंगला विकत घेतल्यानंतर हे महाशय चर्चेत आले होते. छाप्यादरम्यान अनेक ठिकाणच्या संपत्तीचे आणि गुंतवणुकीची कागदपत्र हाती लागल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वकिल एक प्रतिष्ठीत व्यक्ती असून वकिली क्षेत्रात त्यांची चांगली पकड आहे.
आयकर विभागाने सध्या अभियान सुरु केलं असून नागरी उड्डाण, पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्रात काम करणा-यांविरोधात कारवाई केली जात आहे. गेल्या काही दिवसांत या क्षेत्रांशी संबंधिक अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.
संपत्तीची घोषणा करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मदुत 30 सप्टेंबर रोजी संपली असताना ही कारवाई केली जात आहे. आयकर चोरी रोखण्यासाठी सरकारकडून हे महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं होतं. ज्यांनी आपल्या संपत्तीची घोषणा केलेली नाही त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून छापेमारी केली जाणार आहे.
उत्पन्न प्रकटीकरण योजने अंतर्गत एकूण 64,275 करदात्यांनी 65,250 कोटींच्या काळ्या पैशाची माहिती असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं. आयकर चोरी रोखण्यासाठी सरकारकडून महत्वाची पावलं उचलण्यात आलं होतं. 1 जूनला सरकारकडून उत्पन्न प्रकटीकरण योजना सुरु करण्यात आली होती ज्याची मुदत 30 सप्टेंबर 2016 च्या मध्यरात्री संपली.