अबब ! महिलेच्या डोक्यात घुसलं जिवंत झुरळ
By Admin | Published: February 9, 2017 11:32 AM2017-02-09T11:32:07+5:302017-02-09T11:36:59+5:30
चेन्नईतील 42 वर्षीय महिलेला तर प्रत्यक्ष हा अनुभव आला असून हे असं होऊ शकतं यावर तिचाच नाही तर डॉक्टरांचाही विश्वास बसत नव्हता
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - एखादं झुरळ घराच्या कोणत्या कोप-यात जरी दिसलं तरी अनेकजण घाबरुन आरडाओरड करायला सुरुवात करतात. एखाद्या प्राण्याची जितकी भिती वाटत नसावी तितकी त्या झुरळाची दहशत त्यांच्या मनात असते. पण मग हेच झुरळ नाकावाटे तुमच्या कवटीत शिरलं आहे असं एखाद्याला सांगितलं तर त्याची काय परिस्थिती होईल. चेन्नईतील 42 वर्षीय महिलेला तर प्रत्यक्ष हा अनुभव आला असून हे असं होऊ शकतं यावर तिचाच नाही तर डॉक्टरांचाही विश्वास बसत नव्हता.
चेन्नईत राहणा-या या 42 वर्षीय महिलेला सकाळी उठल्यानंतर डोळ्यामागे काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवत होतं. यामुळे त्यांना असह्य वेदनादेखील होत होत्या. त्यांनी लगेच स्थानिक डॉक्टरकडे धाव घेतली. मात्र डॉक्टरांनी तिचं नाक साफ करुन पुन्हा घरी पाठवलं. पण वेदना अजूनही थांबल्या नव्हत्या.
यानंतर त्यांनी तज्ञाकडे जाऊन तपासणी केली असता जे काही दिसलं ते पाहून बेशुद्ध व्हायच्याच बाकी होत्या. समोर जे काही दिसत होतं, हे असं होऊ शकतं हे त्यांना पटतच नव्हतं. त्यांच्यासोबत डॉक्टरदेखील आश्चर्यचकित झाले होते.
'आतमध्ये हालचाल करणारे दोन छोटे पाय मला दिसत होते', असं डॉक्टर एम एन शंकर सांगतात. 'मी नाकाद्वारे अजून आतमध्ये शिरुन पाहिलं असता मला काहीतरी असामान्य दिसलं. मी एका झुरळाला पाहत असल्याचं मला जाणवलं. ते झुरळ खूप आतपर्यंत म्हणजे अगदी कवटीपर्यत घुसलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते झुरळ अद्यापही जिवंत होतं. शस्त्रक्रिया करुन ते झुरळ बाहेर काढलं, तेव्हादेखील ते जिवंतच होतं', अशी माहिती एम एन शंकर यांनी दिली आहे.
'माझ्या तीन दशकांच्या करिअरमध्ये आजपर्यत अशी केस मी पाहिलेली नाही', असं एम एन शंकर सांगतात. '45 मिनिटे शस्त्रक्रिया चालू होती. महिलेची प्रकृती एकदम उत्तम आहे. पण आपल्या डोक्यात झुरळ शिरलं होतं हे सांगायला त्यांना लाज वाटत आहे. त्यांच्यासाठी तर हा जगावेगळा अनुभवच होता', असं एम एन शंकर बोलले आहेत.