UP Assembly Election: उत्तर प्रदेशात कोणाची सत्ता येणार? भाजपला गळती लागली असताना सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 10:54 AM2022-01-14T10:54:42+5:302022-01-14T10:57:33+5:30
UP Assembly Election: उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षात जोरदार संघर्ष; भाजपच्या अनेक आमदारांचे राजीनामे
लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्याच आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसू लागले. आतापर्यंत भाजपच्या १० पेक्षा अधिक आमदारांनी राजीनामे दिले आहेत. गेल्या तीन दिवसांत तीन मंत्र्यांनी पक्ष सोडला आहे. समाजवादी पक्ष अतिशय आक्रमकपणे व्यूहरचना आखत असताना भाजपनं डॅमेज कंट्रोल सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी सी-व्होटरनं एक सर्व्हे केला आहे.
उत्तर प्रदेशात कोणाची सत्ता येईल असा प्रश्न तिथल्या लोकांना विचारण्यात आला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५० टक्के लोकांनी राज्यात भाजपचं सरकार कायम राहील, असं मत व्यक्त केलं आहे. तर २८ टक्के लोकांनी समाजवादी पक्षाचं सरकार येईल, असा अंदाज व्यक्त केला. बहुजन समाज पक्षाला सत्ता मिळेल असं ९ टक्के लोकांना वाटतं. ६ टक्के लोकांना काँग्रेसचं सरकार येईल, असं वाटतं. निवडणुकीनंतर राज्यात त्रिशंकू स्थिती असेल, असं २ टक्के लोकांना वाटतं.
२३ डिसेंबरपासून झालेल्या सर्वेक्षणांमध्ये भाजपचा आलेख चढता राहिला आहे. २३ डिसेंबरला समोर आलेल्या आकडेवारीनुसार ४८ टक्के लोकांना राज्यात भाजपचं सरकार येईल असं वाटत होतं. तीन आठवड्यांनंतर हाच आकडा ५० टक्क्यांवर गेला आहे. तर समाजवादी पक्षाचं सरकार येईल असं वाटणाऱ्यांचं प्रमाण ३१ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर आलं आहे.
योगी आदित्यनाथ सरकारच्या कामकाजाबद्दल लोकांना सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला. ४४ टक्के लोकांनी सरकारचं कामकाज उत्तम असल्याचं सांगितलं. २० टक्के लोकांनी समाधानकारक असल्याचं मत व्यक्त केलं. तर ३६ टक्के लोकांनी कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.