Article 370 रद्द करूनही जम्मू काश्मीरच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालं नाही, मोहन भागवत यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 08:33 AM2021-10-17T08:33:11+5:302021-10-17T08:34:34+5:30
RSS Dr. Mohan Bhagwat on Article 370 Jammu kashmir : लोकसंख्येच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचून त्यांना भारताशी एकरूप करण्याची आवश्यकता असल्याचं भागवत यांचं वक्तव्य.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० केंद्र सरकारनं यापूर्वी रद्द केलं होतं. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Dr. Mohan Bhagwat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतरही त्या ठिकाणच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालेलं नाही. त्या ठिकाणच्या लोकसंख्येचा एक भाग आजही स्वातंत्र्याच्या गोष्टी करत आहे," असं भागवत म्हणाले. नागपुरात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. समाजाला त्या लोकसंख्येच्या भागापर्यंत पोहोचला हवं जेणेकरुन त्यांना भारतासोबत एकरूप करता येईल, असंही ते म्हणाले.
नुकताच आपण जम्मू काश्मीरचा दौरा केला आणि त्या ठिकाणी विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं भागवत म्हणाले. "गेल्या महिन्यात मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान जम्मू काश्मीरच्या मुस्लिम विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की त्यांना भारताचा भाग बनून राहायचं हे आणि आता ते कोणत्याही समस्येशिवाय भारतीय बनून राहू शकतात," असंही त्यांनी नमूद केलं.यापूर्वी जम्मू आणि लडाखला भेदभावाचा सामना करावा लागत होता. काश्मीर खोऱ्यात खर्च होणाऱ्या साधनसंपत्तीच्या वापराचा ८० टक्के हिस्सा हा स्थानिक नेत्यांच्या खिशातजात होता आणि लोकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नव्हता, असा आरोपही त्यांनी केला.
"आता यामध्ये बदल आला आहे आणि त्या ठिकाणची लोकं आनंदानं जीवन जगत आहेत. आपल्या मुलांच्या हाती पुस्तकांऐवजी दगड देणाऱ्या लोकांनी त्यांचं (दहशतवाद्यांचं) कौतुक बंद केलं. आता त्या ठिकाणी निराळं वातावरण आहे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी निवडणुका होतील आणि नव्या सरकारची स्थापनाही होईल," असंही भागवत यांनी नमूद केलं.