मेहुल चोक्सीनं सोडलं भारतीय नागरिकत्व; प्रत्यार्पण आणखी अवघड होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 11:16 AM2019-01-21T11:16:55+5:302019-01-21T11:18:15+5:30
प्रत्यार्पण प्रकरणावरील सुनावणीच्या एक दिवस आधी स्वीकारलं अँटिग्वाचं नागरिकत्व
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीनं भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या चोक्सीनं त्याचा पासपोर्ट एँटिग्वातील भारतीय उच्चायुक्तालयात जमा केला. पीएनबीमधील घोटाळा समोर येताच चोक्सी जानेवारीत देश सोडून पळाला. आता त्यानं भारतीय नागरिकत्व सोडल्यानं त्याच्या प्रत्यार्पणाची शक्यता धूसर झाली आहे.
मेहुल चोक्सीनं आज भारतीय पासपोर्ट जमा करत अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारलं. चोक्सी आता भारतीय नागरिक नसल्यानं त्याला भारतात आणणं आणखी अवघड झालं आहे. विशेष म्हणजे मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पण प्रकरणात उद्याच सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच त्यानं स्वत:ला अँटिग्वाचा नागरिक घोषित केलं. यासाठी त्यानं एकूण 177 डॉलरचं हमीपत्र दिलं. याबद्दलची माहिती परराष्ट्र मंत्र्यालयानं गृह मंत्रालयाला दिली आहे. चोक्सीनं जमा केलेल्या पासपोर्टचा क्रमांक Z3396732 असा आहे. यापुढे चोक्सीचा अधिकृत निवासी पत्ती हार्बर, अँटिग्वा असेल.
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहेत. मात्र त्यानं अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारल्यानं या प्रयत्नांना धक्का बसला आहे. गेल्या सुनावणीवेळी चोक्सीनं त्याच्या प्रकृतीचं कारण दिलं होतं. प्रकृती ठिक नसल्यानं विमानातून 41 तास प्रवास करुन भारतात येऊ शकत नाही, असं कारण चोक्सीनं दिलं होतं. चोक्सीला फरार घोषित करण्यासाठी पीएमएलए विशेष कोर्टात सक्तवसुली संचलनालयानं याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान चोक्सीनं न्यायालयानं प्रकृती अस्वास्थाचं कारण दिलं.