“ज्यांना स्वतःची मुलं नाहीत, त्यांनी हा कायदा आणलाय”; अबू आझमींच्या टीकेवरून नवा वाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:40 PM2021-12-17T12:40:54+5:302021-12-17T12:41:44+5:30
ज्यांना मुले आहेत त्यांचे मत घ्यायला हवे होते, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली: मुलीच्या विवाहाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्यासंदर्भात केंद्र सरकार गांभिर्याने विचार करत असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा टीका करायला सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणी अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलेल्या केलेल्या टीकेनंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांना स्वतःची मुले नाहीत, त्यांना हा कायदा आणला आहे, असा निशाणा साधला आहे.
आई-वडील आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे ओळखतात. यासाठी हे त्यांच्यावरच सोडून दिले पाहिजे. आदिवासी, अनुसूचित जाती, जमातींमध्ये लहानपणीच लग्न लावण्याची पद्धत आहे. तुम्ही हा कायदा तयार करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करत जास्तीत जास्त लोकांना आतमध्ये टाका, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.
ज्यांना मुले नाहीत, त्यांनी हा कायदा आणलाय
ज्यांना मुले नाहीत त्यांनी हा कायदा आणला आहे, सांगत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत, ज्यांना मुले आहेत त्यांचे मत घ्यायला हवे होते. तसेच कोणताही नियम करण्याची गरज नाही, आपल्या मुलाचे, मुलीचे लग्न कधी लावायचे हे त्या कुटुंबावर सोडून दिले पाहिजे, असे अबू आझमी यांनी सांगितले. ते न्यूज १८ शी बोलत होते.
दरम्यान, हा देश अविवाहित लोकांच्या हातात असून, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत. महिलांचे वय २१ झाले, तर मग पुरुषांचे वय २५ केले जाणार का, असा सवाल करत जो कुणी सज्ञान व्यक्ती आहे, त्याला आपल्या विवाहाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणताही विवाह देशात होऊ शकत नाही. जनतेला काय हवे, ते महत्त्वाचे आहे. अविवाहीत मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना काय वाटते, हे महत्त्वाचे नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.