अबू इस्माईलच हल्ल्याचा सूत्रधार

By Admin | Published: July 12, 2017 05:51 AM2017-07-12T05:51:17+5:302017-07-12T05:54:22+5:30

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर लष्कर-ए-तैयबानेच हल्ला घडवून आणला

Abu Ismil invaded the attacker | अबू इस्माईलच हल्ल्याचा सूत्रधार

अबू इस्माईलच हल्ल्याचा सूत्रधार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर लष्कर-ए-तैयबानेच हल्ला घडवून आणला असून, अबू इस्माईल त्याचा मुख्य सूत्रधार होता, असे उघड झाले आहे. या हल्ल्यात प्रचंड मनुष्यहानी व्हावी, असा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. एकाच बसमध्ये ५८ प्रवासी असल्याने तसे शक्य होते. पण बसचा चालक सलीम शेख याने गोळीबार सुरू असताना प्रसंगावधान राखून बस वेगाने पुढे नेल्याने अनेकांचे प्राण वाचले, असे सांगण्यात येते.
मुख्य हल्लेखोर इस्माईल पाकिस्तानी नागरिक असून, तो व पाकिस्तानीच असलेला अबू दुजाना याआधीही काश्मीरमधील अनेक अतिरेकी हल्ल्यांमध्ये सहभागी झाले आहेत. अबू इस्माईलसोबत जे दोघे होते, त्यांची ओळख पटली असून, जे त्यांना हल्ल्याच्या ठिकाणी घेऊ न आले आणि ज्यांनी शस्त्रे आणून दिली, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. हल्ल्यानंतर दहशतवादी कोणत्या दिशेने गेले, हे समजले असून, त्यांना लवकरच अटक होईल, असे जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हल्ला करणाऱ्यांमध्ये अबू इस्माईल सहभागी होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले. ते म्हणाले की, हा हल्ला तैयबानेच केला. त्याची जबाबदारी अबू इस्माईलवर होती. त्याला स्थानिक दहशतवाद्यांनीही मदत केली, असेही मुनीर खान यांनी स्पष्ट केले.
तैयबाने मात्र हल्ल्याचा निषेध केला. हा हल्ला इस्लामविरोधी आहे, अन्य धर्मीयांवर हल्ला वा हिंसाचार हे इस्लामला मान्य नाही, असे तैयबाचा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवीने म्हटले आहे. मात्र याआधी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या पाच हल्ल्यांमध्ये तयबाचाच हात होता.
सध्या थंड पडलेल्या जैश-ए-महमद या संघटनेला सक्रिय करण्यासाठीही तयबा प्रयत्नशील आहे. तयबाने स्थानिकांना जाळ्यात खेचण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये ३0 स्थानिक जण तैयबामध्ये सहभागी झाले असून, उत्तर काश्मीरमध्ये ८0 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना
आर्थिक मदत
प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना गुजरात सरकारने १0 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारकडून प्रत्येकी ७ लाख रुपये तर जम्मू व काश्मीर सरकारकडून ६ लाख अशी एकूण २३ लाख रुपयांची मदत मिळेल.
जखमी झालेल्यांना गुजरातकडून दोन लाख रुपयांची मदत मिळणार असून, काश्मीर सरकार गंभीर जखमींना २ लाख तर अन्य जखमींना १ लाख रुपये मदत देणार आहे. काश्मीर सरकारने बस ड्रायव्हरला तीन लाख रुपयांचे, तर गुजरात सरकारने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
>ड्रायव्हर सलीमचे कौतुक
यात्रेकरूंची बस बलसाडची होती आणि सलीम पटेल ड्रायव्हर होता. गोळीबार सुरू करताच, त्याने प्रसंगावधान राखून बस वेगाने पुढे नेली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. त्यानेच पुढे बस नेल्यानंतर पोलिसांना फोन केला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सलीमचे कौतुक केले. त्याचे नाव शौर्य पदकासाठी सुचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सलीमचे नातेवाईकही त्याच्या कामगिरीमुळे समाधानी
आहेत. अनेक जखमींनी आम्ही केवळ सलीममुळे वाचलो,
असे बोलून दाखविले. त्याच्या प्रसंगावधानाबद्दल काश्मीर पोलिसांनीही कौतुकोद्गार काढले आहेत. - वृत्त/५
आताच्या हल्ल्यासाठी तयबाने हिजबुल मुजाहिद्दीनची मदत घेतल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी हिजबुलने अमरनाथ
यात्रेकरूंवर हल्ला केला नव्हता आणि पाचही हल्ले तैयबानेच
केले होते. गेल्या जुलैमध्ये मारल्या गेलेल्या बुरहान वणीने
अमरनाथ यात्रेकरूंना आमच्याकडून कोणताही धोका होणार नाही, असे जाहीर केले होते. दोन दहशतवादी गटांनी एकत्र येऊन हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.
‘यात्रेच्या मार्गातील सुरक्षा वाढवा’
नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. या भागातील सुरक्षा वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. यात्रेकरूंवर सोमवारी झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जीतेंद्र सिंग हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काश्मीरला गेले आहेत. 

Web Title: Abu Ismil invaded the attacker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.