ईडीचा दुरुपयोग; संसदेमध्ये गोंधळ; कामकाज चालू असताना खरगेंना ईडीचे समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 05:52 AM2022-08-05T05:52:15+5:302022-08-05T05:54:38+5:30
लोकसभा, राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ईडीच्या दुरुपयोगावरून काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला़. केंद्र सरकारवर ईडीच्या दुरुपयोगाचा आरोप करून काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन वेळा सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. अध्यक्षांनी विरोधकांना मुद्दे उपस्थित करण्यास परवानगी दिली नाही. त्यानंतर काँग्रेस सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत आले, तर द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस व सीपीआय-एम आणि अन्य सदस्यांनी आपापल्या जागी उभे राहून निषेध करीत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीत दोन ठराव संमत झाले. गोंधळातच वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दोन ठराव मांडले.
काँग्रेसच्या सदस्यांकडून जोरदार घोषणाबाजी
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ईडीची कारवाई, आवश्यक वस्तूंवरील जीएसटी आणि भाववाढीला जोरदार विरोध केला. तथापि, ११.३० वाजता काँग्रेसचे काही सदस्य हातात फलक घेऊन अध्यक्षांच्या आसनापुढील जागेत उभे असताना अध्यक्ष ओम बिरला यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पहिल्यांदा फलक दाखविले आणि नंतर अन्य सदस्यांनी फलक आणले.