दिल्ली विद्यापीठात अभाविपचा मोर्चा
By admin | Published: March 3, 2017 04:41 AM2017-03-03T04:41:38+5:302017-03-03T04:41:38+5:30
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गुरुवारी दिल्ली विद्यापीठावर (डीयू) मोर्चा काढला
नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गुरुवारी दिल्ली विद्यापीठावर (डीयू) मोर्चा काढला. अराजकता आणि भारतविरोधी प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी होती. मोर्चादरम्यान, त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘देश के गद्दारों को, गोली मारो सालों को’ अशा घोषणा दिल्या. डीयूला राष्ट्रविरोधी कारवायांपासून वाचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे अभाविपने म्हटले आहे.
अभाविपने डाव्यांविरुद्ध मोर्चा काढला. काश्मीर आमचा आहे, दिल्ली विद्यापीठ वाचवा, अशा घोषणा ते देत होते. कार्यकर्त्यांच्या हातात केरळमध्ये ठार करण्यात आलेल्या रा.स्व. संघ कार्यकर्त्यांच्या छायाचित्रांची पोस्टर्स होती.
>बापाच्या हौतात्म्याचे राजकारण अयोग्य
चंदीगड : अभाविपविरुद्धच्या मोहिमेसाठी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरचे समर्थन करणारे पाकिस्तानधार्जिणे असून, त्यांना देशाच्या बाहेर फेकले पाहिजे, असे विधान हरियाणा सरकारमधील मंत्री अनिल विज यांनी गुरुवारी केले.
दोन विद्यार्थ्यांचे जबाब
रामजस कॉलेजमधील राड्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने गुरुवारी स्टीफन कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचे जबाब घेतले. या दोघांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.