दिवाळीनंतर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार; AC, TV, फ्रीजही महागणार, 'ही' आहेत कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:00 PM2021-10-26T17:00:45+5:302021-10-26T17:07:50+5:30
AC, TV Refrigerator to be costly : दिवाळीनंतर एसी, टीव्ही, फ्रीज यासारख्या इलेक्ट्रिक वस्तुंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - घरामध्ये नवीन इलेक्ट्रीक वस्तू घेणाऱ्याच्या खिशाला आता अधिक कात्री लागण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर एसी, टीव्ही, फ्रीज यासारख्या इलेक्ट्रिक वस्तुंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वस्तू घेण्याचा विचार असेल तर लगेच घेऊन टाका. कारण कंज्युमर ड्युरेबल्स प्रोडक्टच्या किमती वाढू शकतात. गेल्या काही दिवसात स्टील, तांबे, एल्युमिनियमच्या (Steel, Copper, Aluminium) दरात वाढ झाली आहेत. त्यामुळे कंज्युमर ड्युरेबल्स कंपन्यांवर त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा दबाव निर्माण झाला आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालाची वाहतूकही महाग झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांकडे दरवाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा देखील या कंपन्यांना सतावत आहे. सणासुदीच्या काळात कंज्युमर ड्युरेबल्स कंपन्यांनी अधिक विक्रीच्या पार्श्वभूमीवर दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळेच दिवाळीनंतर या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत सात ते दहा टक्क्यांनी वाढ करू शकतात, असं म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून धातूंच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने दरवाढीची प्रक्रिया होईल सुरू
बहुतेक कंपन्या चीनमधून घटक आयात करतात आणि चीनमधून येणारे मालवाहतूक शुल्क (China Freight charges) पाच पटीने वाढले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी दरात वाढ केलेली नाही. परंतु ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनी ही वाढलेली किंमत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी केली आहे. त्यामुळेच दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने दरवाढीची प्रक्रिया सुरू होईल. दसऱ्याला कंझ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांची विक्री जबरदस्त झाली असून, त्यात ई-कॉमर्स कंपन्यांचा मोठा वाटा आहे.
एसी टीव्ही, फ्रीज, गिझरही होऊ शकतात महाग
नवरात्रीमध्ये एसी, टीव्ही, फ्रीजला चांगली मागणी होती. आता कंपन्यांना अपेक्षा आहे की धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावरही चांगली विक्री दिसून येईल. Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केलेला बिग सेल अजूनही सुरू आहे. दिवाळीनंतर कंज्युमर ड्युरेबल्स कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तू महाग झाले असताना आता एसी टीव्ही, फ्रीज, गिझरही महाग होऊ शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.