पेट्रोल पंपांवर कार्ड पेमेंट विनाशुल्क स्वीकारणार
By admin | Published: January 10, 2017 04:22 AM2017-01-10T04:22:57+5:302017-01-10T04:22:57+5:30
पेट्रोल पंपांवर डेबिट आणि के्रडिट कार्ड १३ जानेवारीनंतरही स्वीकारली जातील व त्यासाठी ग्राहकाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही
नवी दिल्ली : पेट्रोल पंपांवर डेबिट आणि के्रडिट कार्ड १३ जानेवारीनंतरही स्वीकारली जातील व त्यासाठी ग्राहकाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, असा खुलासा सोमवारी केंद्र सरकारने येथे केला. डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापराचा खर्च कोणी सोसायचा हा प्रश्न बँका आणि तेल कंपन्यांत चर्चेत आहे. तेल कंपन्यांनी ही कार्डे आम्ही स्वीकारणार नाहीत, असे रविवारी स्पष्ट केल्यानंतर देशातील लक्षावधी ग्राहकांची गैरसोय होणार होती. ते संकट टाळण्यासाठी दुसऱ्याच दिवशी सरकारने हा खुलासा केला.
मर्चंट डिस्काउंट रेटचे (एमडीआर) शुल्क रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार आकारले जाईल. परंतु ते सोसायचे कोणी यावर बँका आणि तेल विपणन कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वार्ताहरांना सांगितले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी प्रधान यांची याच मुद्यावर चर्चा झाली.
पेट्रोलची किरकोळ विक्री करणारे, पेट्रोलपंपांचे मालक हे कमिशन एजंट म्हणून काम करीत असून आम्ही हा खर्च त्यांच्यावर टाकणार नाही, असे आश्वासन रविवारी आम्ही दिले होते, असे प्रधान म्हणाले. कार्ड वापरण्याचे एक टक्का शुल्क पेट्रोल पंप चालकांना द्यावे लागेल, असे बँकांनी त्यांना सांगितल्यावर पंप चालकांनी आम्ही कार्डने पैसे स्वीकारणार नाही, अशी धमकीच दिली होती. ट्रॅन्झॅक्शन चार्जेस (व्यवहार शुल्क) आणखी पाच दिवस आम्ही आकारणार नाही, असे बँकांनी मान्य केल्यावर हा पेच तात्पुरता सुटला. पंपचालकांनी १३ जानेवारीपर्यंत इशारा अमलात आणणार नसल्याचे सांगितले. जे ग्राहक रोखविरहीत व्यवहार डिजिटल माध्यमातून करतील त्यांना व्यवहारासाठी खर्च सोसावा लागणार नाही हे आश्वासन मागे घेतले जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.