‘११२’ एकल आपत्कालीन मदत क्रमांकाला २० राज्यांची स्वीकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 04:28 AM2019-04-20T04:28:38+5:302019-04-20T04:28:51+5:30
भारतात एकच एक आपत्कालीन मदत क्रमांक असावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ११२ या क्रमांकाला २0 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वीकृती दिली आहे.
नवी दिल्ली : संकटाच्या वेळी मदत मिळविण्यासाठी संपूर्ण भारतात एकच एक आपत्कालीन मदत क्रमांक असावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ११२ या क्रमांकाला २0 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वीकृती दिली आहे. संकटात असलेला कोणीही या क्रमांकावर फोन करून मदत मागवू शकतो.
११२ हा मदत क्रमांक पोलीस (१00), अग्निशामक दल (१0१) आणि महिला मदत केंद्र (१0९0) या सर्व सेवांना एकत्रितरीत्या सामावून घेतो. या एकाच क्रमांकावरून तिन्ही सेवांची मदत घेतली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या निर्भया निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमेरिकेतील ९११ या आपत्कालीन क्रमांकाच्या धर्तीवर भारत सरकारने ११२ हा क्रमांक सुरू केला आहे. संपूर्ण अमेरिकेत कुठल्याही प्रकारच्या संकटात असलेली व्यक्ती ९११ या क्रमांकावर फोन करून मदत मागू शकते.
गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ११२ हा क्रमांक स्वीकारणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, पुडुचेरी, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, दादर व नगर हवेली, दमन व दीव जम्मू व काश्मीर आणि नागालँड यांचा समावेश आहे.