रॅगिंगचा परंपरा म्हणून केला जातो स्वीकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:18 AM2017-08-16T04:18:57+5:302017-08-16T04:19:04+5:30
एकीकडे रॅगिंगला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासह राज्य सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे याविरोधात खुद्द विद्यार्थीच तक्रार करत नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
बंगळुरू : एकीकडे रॅगिंगला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासह राज्य सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे याविरोधात खुद्द विद्यार्थीच तक्रार करत नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ८४ टक्के विद्यार्थी रॅगिंगविरोधात ‘आवाज’ बंद करतात. तर बहुतांशी विद्यार्थी ही एक परंपरा म्हणून रॅगिंगचा स्वीकार करतात, अशी धक्कादायक बाब सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पॅनेलच्या सर्वेक्षणातून उघडकीस आलेली आहे. या सर्वेक्षणात देशभरातील १०,६३२ विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात आला.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल अॅण्ड न्यूरोसायन्सेसच्या (एनआयएमएचएएनएस) तज्ज्ञांचे मिळून सर्वोच्च न्यायालयाने एक पॅनेल नियुक्त केले. या पॅनेलने विद्यार्थ्यांच्या रॅगिंगसंदर्भातील मानसिकतेचा अभ्यास केला. या अभ्यासाचा निष्कर्ष युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने (यूजीसी) प्रसिद्ध केला.
देशभरातील एकूण ३७ महाविद्यालयांच्या १०,६३२ विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास या पॅनेलने केला. ३६ टक्के विद्यार्थ्यांच्या मते रॅगिंग त्यांना या जगातील भयाण वास्तवाची जाणीव करून देते व त्याच्याशी सामना करण्यासाठी मानसिकरीत्या तयार करते. तर ३२ टक्के विद्यार्थी रॅगिंगचा आनंद घेतात. मात्र ८४ टक्के विद्यार्थी रॅगिंगविरोधात तक्रार न करणे पसंद करतात, असे सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. ४० टक्के विद्यार्थ्यांना त्यांचे सिनिअर या ना त्या कारणास्तव रॅगिंग करतात. याचाच अर्थ रॅगिंगविरुद्ध महाविद्यालयांत यंत्रणा असतानाही ही प्रथा अद्याप बंद झालेली नाही. मात्र काही विद्यार्थ्यांना ही ‘परंपरा’ वाटते आणि ती पुढे सरकलीच पाहिजे असे वाटते.
प्रतिवादी विद्यार्थ्यांतील ३५.१ टक्के विद्यार्थ्यांनी सौम्य रॅगिंगचा अनुभव घेतला आहे. तर ४.१ टक्के विद्यार्थ्यांना गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागले आहे. याच विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या वेळी त्यांच्या भावनिक अनुभवाविषयी विचारले असता त्यांच्याकडून मिळालेली उत्तरे धक्कादायक असल्याचे पॅनेलने अहवालात म्हटले. ३३ टक्के विद्यार्थ्यांनी आपण रॅगिंगचा अनुभव घेतल्याचे सांगितले. तर ४५.१ टक्के विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आपल्याला वाईट वाटल्याचे व त्यानंतर आनंद घेतल्याचे सांगितले. तर काहींनी सांगितले की, आपल्यावर ज्या सिनिअरने रॅगिंग केली होती, त्या सिनिअरची आणि आपली चांगली मैत्री झाल्याचेही पॅनेलला सांगितले.
रॅगिंगच्या वेळी काही जणांना त्यांच्या सिनिअर्सना ‘सर’, ‘मॅडम’ म्हणण्यास सांगितले. तर काही जणांना मद्यपान किंवा धूम्रपान करण्यास सांगितले. त्याशिवाय काहींचा मानसिक किंवा शारीरिक छळ करण्यात आला. मात्र याविरोधात आवाज उठवण्याऐवजी बहुतांशी विद्यार्थ्यांनी याचा स्वीकार केला.
विद्यार्थ्यांनी रॅगिंगचा स्वीकार केला म्हणून त्याबद्दल कोणाच्याही निदर्शनास आणून न देणे, हे अयोग्य आहे, असे पॅनेलचे सदस्य डॉ. शेखर सेशाद्री यांनी सांगितले. ‘रॅगिंग ही अनुवांशिक आणि असमान समाज व्यवस्थेतून निर्माण झाली आहे. याबद्दल तक्रार न करणे याचा अर्थ विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे आणि अस्तित्वात असलेल्या यंत्रणेच्या कारभाराविषयी अविश्वास आहे,’ असे मत डॉ. शेखर यांनी व्यक्त केले.
यावर उपाय म्हणून पॅनेलने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची सूचना केली आहे. रॅगिंगबाबत ‘शून्य सहनशक्ती’ ठेवण्याची सूचनाही महाविद्यालयांना केली आहे.
>१०,६३२ विद्यार्थांच्या मानसिकतेचा अभ्यास
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल अॅण्ड न्यूरोसायन्सेसच्या तज्ज्ञांचे मिळून सर्वोच्च न्यायालयाने एक पॅनेल नियुक्त केले. या पॅनेलने विद्यार्थ्यांच्या रॅगिंगसंदर्भातील मानसिकतेचा अभ्यास केला. या अभ्यासाचा निष्कर्ष युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने (यूजीसी) प्रसिद्ध केला. सर्वेक्षणात देशभरातील १०,६३२ विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात आला.