एकाच परीक्षेतून एम्स, जिपमरसह सर्व मेडिकल जागांसाठी प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 04:05 AM2019-12-04T04:05:58+5:302019-12-04T04:10:02+5:30
इंग्रजी आणि अन्य दहा भाषेत परीक्षा घेण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : देशभरात वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय (एमबीबीएस/ बीडीएस) अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश (नीट) परीक्षा ३ मे रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या आधारे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण-संशोधन संस्थेसह (जेआयपीएमईआर) देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्व वैद्यकीय अभ्यासकम्रांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
राष्टÑीय परीक्षा संस्थेचे (एनटीए) महासंचालक विनित जोशी यांनी सांगितले की, वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळी परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील विविध वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेचा ताण कमी होईल. शिवाय विद्यार्थी आणि पालकांना खर्चही कमी लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी एम्स, जिपमर आणि अन्य महाविद्यालयात प्रवेशसाठी वेगवेगळ्या परीक्षांचे आयोजन केले जात होते. केंद्र सरकारने अलीकडेच मेडीकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या जागी नॅशनल मेडीकल कमीशन स्थापन केले आहे. आयुर्वेदिक, होमियोपॅथिक, अॅलोपॅथी, युनानी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एकाच परीक्षेचे आयोजन केले जाईल. त्याच आधारे प्रवेश दिले जातील. लेखी परीक्षा व्हावी, ही मंत्रालयाची शिफारस एनटीएने मान्य केली आहे. राज्यांच्या मागणीची दखल घेऊन यावेळी लेखी परीक्षा घेतली जाईल.
इंग्रजी आणि अन्य दहा भाषेत परीक्षा घेण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयासह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. किमान वयोमर्यादा १७ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २५ वर्षांपर्यत आहे. परीक्षा शुल्क १५०० रुपये, आर्थिक दुर्बल घटक आणि इतर मागासवर्गीय (नॉन क्रीमीलेअर) विद्यार्थ्यांसाठी १४०० रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे. इतर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क ८०० रुपये आहे.
नीट परीक्षेचे वेळापत्रक
परीक्षेची तारीख- ३ मे २०२० (वेळ- दुपारी २ ते सायं. ५ पर्यंत)
परीक्षेचा अवधी- तीन तास (१८० मिनिट)
आॅनलाईन परीक्षा अर्ज सादर (फोटो, स्वाक्षरीसह अपलोड करण्यासह) करण्याची मुदत- २ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ रात्री ११.५० पर्यंत
आॅनलाईन शुल्क भरण्याची मुदत- २ डिसेंबर २०१९ ते १ जानेवारी २०२० (रात्री ११.५० पर्यंत) निकालाची तारीख- ४ जून २०२०
अर्ज प्रक्रिया सुरू
मुंबई : एमबीबीएएस, बीडीएस अभ्यासक्रमांसाठी ३ मे रोजी घेण्यात येणाºया राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेसाठी (नीट) अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील.