सुविधा नसलेल्या महाविद्यालयांचे प्रवेश रोखणार
By admin | Published: May 7, 2014 08:35 PM2014-05-07T20:35:31+5:302014-05-07T21:46:19+5:30
पुढील शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांचे प्रवेश रोखण्याबाबत विद्यापीठाने उपाययोजना कराव्यात, अशी चर्चा नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत करण्यात आली.
पुणे: पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 79 महाविद्यालयांमध्ये सुमारे दहा वर्षांपासून एकाही मान्यता प्राप्त प्राध्यापक व प्राचार्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी या महाविद्यालयातून मिळत नाहीत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांचे प्रवेश रोखण्याबाबत विद्यापीठाने उपाययोजना कराव्यात, अशी चर्चा नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत करण्यात आली.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 79 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली होती. तब्बल 10 वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरीही काही महाविद्यालयांनी एकाही मान्यताप्राप्त प्राध्यापकाची नियुक्ती करून घेतली नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांचे प्रवेश थांबविण्याबाबत शिक्षण वर्तुळात चर्चा सुरू होती. शासनानेही या महाविद्यालयांबाबत विद्यापीठाने योग्य निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर विस्तृतपणे चर्चा झाली.
विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ.व्ही.बी.गायकवाड म्हणाले,मान्यता प्राप्त प्राध्यापकांची नियुक्ती न केलेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यातील ब-याच महाविद्यालयांनी उत्तर पाठविले आहेत. आता महाविद्यालयाकडून विद्यापीठाला प्राप्त झालेल्या पत्रांची छाणणी केली जाईल. तसेच किती महाविद्यालयांनी प्राध्यापकांची नियुक्ती केली नाही याची तपासणी केली जाईल आणि हा अहवाल विद्यापरीषदेसमोर ठेवला जाईल.त्यानंतर संलग्नता काढून घेण्याची कार्यवाही करता येईल.