महिलांना मंदिरात प्रवेश हा कायद्याचा विषय, प्रथेचा नाही- सर्वोच्च न्यायालय
By admin | Published: April 11, 2016 09:26 PM2016-04-11T21:26:49+5:302016-04-11T21:27:54+5:30
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता महिलांना सबरीमालात प्रवेश मिळणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११- शनिशिंगणापूर आणि अंबाबाई मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यानंतर आता सबरीमाला मंदिरातही महिलांच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे. बहुचर्चित सबरीमालात महिलांना प्रवेश नाकारला जात होता. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता महिलांना सबरीमालात प्रवेश मिळणार आहे.
पर्वत चढण्याचा अधिकार तुम्ही महिलांपासून हिरावून घेऊ शकता का ?, असा सवाल उपस्थित करून सुप्रीम कोर्टानं सरकारला यावेळी धारेवर धरलं आहे. महिलांना मंदिरात प्रवेश हा संविधानाचा विषय आहे, प्रथेचा नाही. कशावर बंदी आणायची हे सरकार ठरवणार का, असं म्हणत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आमच्या निर्णयामुळे सबरीमाला मंदिरात महिलांना नक्कीच प्रवेश मिळेल, असा विश्वास सुप्रीम कोर्टानं व्यक्त केला आहे.
इंडियन यंग लॉयर असोसिएशन(IYLA)नं केरळातल्या सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान कोर्टानं हा निर्णय दिला आहे. तीन न्यायाधीशांच्या बेंचनं हा निर्णय दिला आहे, अशी माहिती न्यायाधीश दीपक मिश्रांनी दिली आहे. कोणतीही बंदी ही कायद्याच्या स्वीकृतीनुसारच असायला हवी, असंही ठाम मत यावेळी सुप्रीम कोर्टानं मांडलं आहे.