Accident : पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 10 भाविकांचा मृत्यू 7 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:42 AM2022-06-23T10:42:39+5:302022-06-23T10:43:47+5:30
पीलीभीतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन मदत व बचावकार्य करण्याचे आदेश दिले आहेत
पीलीभीत - उत्तर प्रदेशच्या पीलीभीत येथे आज सकाळी भीषण अपघाताची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हरिद्वारहून येत असलेल्या डीसीएम या चारचाकी कारची झाडावर धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पीलीभीतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन मदत व बचावकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तर, जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात येत असल्याचेही सांगितले. रुग्णायातील जखमींपैकी 2 जणांना बरेली येथे रेफर करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी ऑटो आणि ट्रकच्या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
हरिद्वार येथून गंगा स्नान केल्यानंतर सायंकाळी 5 वाजता तेथून गोलासाठी हे सर्व भाविक निघाले होते. टाटा एस कारमधून 17 भाविक रात्रीचा प्रवास करत असताना पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ड्रायव्हरला झोप नियंत्रणात न आल्याने डुकला लागताच गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी झाडाला धडकली, अशी प्राथमिक माहिती आहे.
UP | 10 dead, 7 injured after a DCM vehicle returning from Haridwar met with an accident at about 4:30 am this morning. Of the 17 people, 10 died on the spot, 5 being treated at a district hospital, 2 referred to Bareilly. We've contacted their families..: Pilbhit DM Pulkit Khare pic.twitter.com/V92UDkn17U
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 23, 2022
पीलीभीतच्या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत आणि बचावकार्य पुरविण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. जखमींच्या उपचारासंदर्भातही त्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.