रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आईला अपघात, आता खड्डे भरण्यासाठी मुलीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देऊ केला पॉकेटमनी, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:33 IST2021-10-25T17:31:13+5:302021-10-25T17:33:06+5:30
Karnataka News: कर्नाटकमधील एका चिमुकलीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना तिचा पॉकेटमनी देऊ केला आहे. त्या पैशांच्या माध्यमातून तिने मुख्यमंत्र्यांना बंगळुरूमधील रस्त्यांवरील खड्डे भरून घेण्याचे आवाहन केले आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आईला अपघात, आता खड्डे भरण्यासाठी मुलीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देऊ केला पॉकेटमनी, म्हणाली...
बंगळुरू - कर्नाटकमधील एका चिमुकलीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना तिचा पॉकेटमनी देऊ केला आहे. त्या पैशांच्या माध्यमातून तिने मुख्यमंत्र्यांना बंगळुरूमधील रस्त्यांवरील खड्डे भरून घेण्याचे आवाहन केले आहे. या मुलीच्या आईचा दोन वर्षांपूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाला होता. त्यामुळे तिचा एक पाय तुटला होता. दरम्यान, धवनी नावाच्या या ७ वर्षीय मुलीने एक व्हिडीओ तयार करून मुख्यमंत्र्यांना आपला पॉकेटमनी देऊ केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या व्हिडीओमध्ये मुलीने मुख्यमंत्री बोम्मई यांचा ताता मअसा उल्लेख केला आहे. कन्नडमध्ये आजोबांना ताता म्हणतात. सदर मुलगी दुसरीतील विद्यार्थिनी आहे. ती हग्गनहल्ली सरकारी शाळेत शिकते. तिचे वडील तुमकुरू जिल्ह्यातील तिपतूर येथे बांधकाम मजूर आहेत. पश्चिम बंगळुरूमध्ये झालेल्या एका अपघातानंतर तिने हा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. या अपघातात एका ६५ वर्षिय दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला होता. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे या व्यक्तीची तीन चाकी गाडी उलटली आणि त्यांचा मृत्यू झाला होता.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबांबत सांत्वन व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ती म्हणाली की, आजोबा, कुपया सांगा की, या मृत्यूनंतर ही कुटुंबे कशी सावरतील. दोन वर्षांपूर्वी धवनीची आई रेखा नवीन हिचाही अपघात झाला होता. त्यात तिला पाय गमवावा लागला होता. दरम्यान, रेखा यांनी सांगितले की, धवनी त्यावेळी लहान होती. तसेच परिस्थिती योग्य पद्धतीने समजू शकत नव्हती. आता ती मोठी झाली आहे. तसेच तिचे मित्र आणि कुटुंबाला अशा प्रकारच्या घटनांना कशा प्रकारे सामोरे जात आहेत हे तिने पाहिले आहे.
धवनी हिने अशा प्रकारचा एका अन्य देशातील व्हिडीओ पाहिला होता. त्यामध्ये एक मुलगी रस्त्यावर असलेले खड्डे भरत होती. त्यानंतर तिने तिच्या आई-वडिलांनाही असे करण्याबाबत विचारले. बंगळुतील रस्त्यावर खूप खड्डे आहेत. त्यामुळे रेखा हिने धवनीला याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यास सांगितले. त्यानंतर धवनी हिने हा भावूक व्हिडीओ तयार केला.