अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 05:55 AM2023-06-07T05:55:44+5:302023-06-07T05:57:19+5:30
रेल्वे अपघातात मदतकार्यासाठी पुढे आलेल्या एनडीआरएफच्या जवानांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी कथित गुन्हेगारी स्वरूपाच्या निष्काळजीपणाबाबत सीबीआयने मंगळवारी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. या अपघातात २७८ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक चौकशीत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय तपास एजन्सीकडे तपास सोपविण्याचे ठरविले. या अपघातामागे घातपात, तोडफोड झाल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.
फॉरेन्सिक तज्ज्ञांसह सीबीआय अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी बालासोर जिल्ह्यात पोहोचले. त्यानंतर मंगळवारी त्यांनी दुपारी २.१५ वाजता गुन्हा दाखल केला. ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघात झाल्यानंतर सीबीआयने गुन्हा नोंदविल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. ओडिशा सरकारने सोमवारीच पत्राद्वारे सीबीआयला तपास करण्यास संमती दिली. रेल्वे पोलिसांनी ३ जून रोजी नोंदविलेल्या गुन्ह्याची कॉपी सीबीआयने ताब्यात घेतली आहे.
रेल्वे अपघातातील १०० हून अधिक मृतदेहाची ओळख पटलेली नाही. येथील विविध हॉस्पिटलमध्ये हे मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत. भुवनेश्वरमधील एम्सने डीएनए नमुने घेण्याचे काम सुरू केले आहे.
४० प्रवाशांचा विजेचा धक्का लागून मृत्यू
कोरोमंडल एक्स्प्रेसमधून बाहेर काढलेल्या सुमारे ४० मृतदेहांवर जखमेच्या कोणत्याही खुणा नाहीत आणि त्यांचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाला असावा, असे रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, अपघाताच्या वेळी तुटलेल्या थेट ओव्हरहेड वायर्स काही डब्यांमध्ये अडकल्या आणि त्यात अडकलेल्या प्रवाशांना विजेचा धक्का बसला.
पाणीही रक्तासारखे दिसते...जवानांना धक्का
रेल्वे अपघातात मदतकार्यासाठी पुढे आलेल्या एनडीआरएफच्या जवानांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. या जवानांनी ४४ लोकांना वाचविले, तर १२१ मृतदेह बाहेर काढले. एका जवानाने सांगितले की, जेव्हा तो पाणी पाहतो तेव्हा त्याला रक्तासारखे वाटते. तर दुसऱ्या जवानाने सांगितले की, या घटनेनंतर त्याला भूक लागणे बंद झाले आहे. या जवानांसाठी एनडीआरएफने मनोवैज्ञानिक समुपदेशन सुरू केले आहे.