'द अॅक्सिडेंटल चीफ मिनिस्टर', भाजपाकडून कुमारस्वामींची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:11 PM2018-12-29T14:11:19+5:302018-12-29T14:12:18+5:30
कर्नाटकमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर सर्वात कमी संख्याबळ असतानाही, जेडीएस पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र एचडी. कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे.
बंगळुरू - भाजपाने द अॅक्सिडेंटल पीएम चित्रपटाचा ट्रेलर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यानंतर, आता कर्नाटक भाजपने आपल्या अकाऊंटवरुन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. जर अॅक्सिडेंटल सीएम हा चित्रपट बनविण्यात आला तर, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची भूमिका कोण बजावणार ? असा प्रश्न विचारला आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर सर्वात कमी संख्याबळ असतानाही, जेडीएस पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र एचडी. कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेत सर्वाधिक संख्याबळ असतानाही येथे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले आहे. काँग्रेसने सर्वच तडजोड करुन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले तर कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले. त्यामुळे, कुमारस्वामी हे नशिबाने मुख्यमंत्री बनले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे कर्नाटक भाजपाने कुमारस्वामी यांना द अॅक्सिडेंटल सीएम असे म्हटले आहे.
कर्नाटकमधील विधानसभेच्या 222 जागांपैकी 104 जागा जिंकत भाजपा येथे सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या आहेत. मात्र, जेडी(एस) पक्षाला केवळ 37 जागांवर विजय मिळाला आहे. तरीही, जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळेच, भाजपाने 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाचा आधार घेत, द अॅक्सिडेंटल चीफ मिनिस्टर असे म्हणून कुमारस्वामी यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला आहे.
If there was a movie titled #AccidentalCM who will play the role of @hd_kumaraswamy ?
— BJP Karnataka (@BJP4Karnataka) December 29, 2018