दर 15 मिनिटांनी एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:31 AM2017-08-03T00:31:04+5:302017-08-03T00:31:15+5:30
रस्ते अपघातांत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दर १५ मिनिटांनी एका दुचाकी चालकाला जीव गमवावा लागतो आहे.
नितीन अग्रवाल ।
नवी दिल्ली : रस्ते अपघातांत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दर १५ मिनिटांनी एका दुचाकी चालकाला जीव गमवावा लागतो आहे. यात सगळ्यात जास्त जीवितहानी महाराष्ट्र, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील आहे.
भाजपाचे नाना पटोले यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना राधाकृष्णन म्हणाले की, अपघातांबद्दल पोलिसांकडील नोंदींवरून सगळ््या प्रकारच्या रस्त्यांवरील अपघातांत जवळपास १५ मिनिटांत दुचाकीचालकाचा मृत्यू होत असतो. यात स्कूटर आणि मोपेड समाविष्ट आहे.
रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी लोकसभेत सांगितले की, तीन वर्षांत २०१५ मध्ये रस्ते अपघातांत १,२६,३८० दुचाकी वाहनचालकांचा मृत्यू झाला.
यातील सगळ्यात जास्त ४६,०७० लोक २०१५ मध्ये मरण पावले. मृतांत ३०,६५६ व्यक्ती २० ते ३४ वयाचे होते. त्यातील १६,८९७ लोकांचा मृत्यू महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील आहेत.
पटोले यांना हेही माहीत करून घ्यायचे होते की, अशा दुर्घटना थांबवण्यासाठी मंत्रालय राष्ट्रीय राजमार्गांवर इंटरसेप्टर तुकड्या तैनात करणार आहे का? त्यावर राधाकृष्णन यांनी अशा कोणत्याही प्रस्तावार विचार करायला नकार दिला.
दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेटचे मानकाबाबत ते म्हणाले की, त्यासाठी बीआयएस ४,१५१ मानक बनविण्यात आले आहे.