तामिळनाडूत अपघाती मृत्यू अधिक
By admin | Published: July 19, 2016 05:55 AM2016-07-19T05:55:14+5:302016-07-19T05:55:14+5:30
देशात जवळपास पाच लाख रस्ते अपघातांत एक लाख ४६ हजार लोकांना प्राण गमवावे लागले.
मनवर सिंह,
नवी दिल्ली- देशात जवळपास पाच लाख रस्ते अपघातांत एक लाख ४६ हजार लोकांना प्राण गमवावे लागले. रस्ते अपघातातील बळींची संख्या तामिळनाडू व महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. रस्ते अपघातांतील बळींची संख्या २०१३ मध्ये १ लाख ३७ हजार ५७२ होती, ती २०१४ मध्ये १ लाख ३९ हजार ६७१ तर २०१५ मध्ये आणखी वाढून १ लाख ४६ हजार १३३ झाली.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘इंटरनॅशनल रोड फेडरेशन, जिनेव्हाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, जागतिक रस्ता आकडेवारी २०१५ (डब्ल्यूआरएस) नुसार २०१३ या वर्षी रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू भारतात (१३७५७२) झाले. यानंतर, अमेरिका (३२७१९) आणि रशिया (२७०२५) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. रस्ते अपघातांना व त्यातील बळींच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गांना सर्व्हिस रोडची तरतूद, जंक्शनमध्ये सुधारणा, दादरा, भूमिगत रस्त्याची तरतूद यासह अभियांत्रिकी उपायांद्वारे अपघाती ठिकाणांची स्थिती सुधारण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले.