ग्रेनेडचा अपघाती स्फोट: कॅप्टन, जेसीओ ठार; जम्मू आणि काश्मीरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 07:39 AM2022-07-19T07:39:14+5:302022-07-19T07:39:48+5:30
जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक (एलओसी) रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली
जम्मू : ग्रेनेडचा अपघाताने स्फोट होऊन लष्करी कॅप्टन व ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) असे दोनजण ठार झाले. जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक (एलओसी) रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
भारतीय लष्कराचे जवान मेंधर सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना, रविवारी रात्री हा स्फोट झाला. यात कॅप्टन आनंद व जेसीओ नायब सुभेदार भगवान सिंह हे जखमी झाले. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने लष्कराच्या उधमपूर येथील कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे लष्कराच्या जम्मू विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले.
कॅप्टन आनंद हे बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील चंपा नगरचे, तर नायब सुभेदार भगवान सिंह हे उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील पोखर भिट्टा येथील रहिवासी होते. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारचे कॅप्टन आनंद आणि त्यांचे सहकारी जेसीओ भगवान सिंह यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या दु:खाच्याप्रसंगी राज्य शासन कॅप्टन आनंद यांच्या कुटुंबियांसोबत आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)