चांगल्या रस्त्यांमुळेच अपघात होतात; भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 12:12 PM2019-09-12T12:12:46+5:302019-09-12T12:15:13+5:30
उपमुख्यमंत्र्यांच्या विधानावर सोशल मीडियाची टीका
बंगळुरू: देशात नवा मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. त्यामुळे नियम मोडल्यावर चालकांना भरभक्कम दंड भरावा लागतो आहे. यानंतर आता चांगल्या रस्त्यांची मागणी जोर धरू लागली आहे. आधी चांगले रस्ते द्या आणि मग दंड वसूल करा, असा सूर सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. यावर भाष्य करताना खराब रस्त्यांमुळे नव्हे, तर चांगल्या रस्त्यांमुळे अपघात होत असल्याचं अजब विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांनी केला आहे. करजोल यांच्या विधानावर सोशल मीडियानं टीकेची झोड उठवली आहे.
अपघातांसाठी खराब रस्ते नव्हे, तर चांगले रस्ते जबाबदार आहेत, असं अजब तर्कट गोविंद करजोल यांनी सांगितलं. 'द्रुतगती महामार्गांची स्थिती अतिशय उत्तम असते. त्यावर 100 ते 120 किलोमीटर वेगानं वाहनं धावतात आणि अपघात होतात,' असं करजोल म्हणाले. सर्वाधिक अपघात द्रुतगती मार्गावरच होतात, असा दावादेखील त्यांनी केला. नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम जास्त असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होईल आणि त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असं करजोल यांनी सांगितलं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पादेखील नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेविरोधात आहेत. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी गुजरात मॉडेलचा अभ्यास करा, असे आदेश येडियुरप्पांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुजरातनं नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम थेट 90 टक्क्यांनी कमी केली आहे. कर्नाटक सरकारदेखील लवकरच गुजरातप्रमाणे दंडाची रक्कम कमी करू शकतं.