नव्या नियमावलीनुसार ९0% ग्राहक १ फेब्रुवारीपासून अर्ज भरतील; ट्रायला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:20 AM2019-01-29T04:20:25+5:302019-01-29T04:20:40+5:30
१ फेब्रुवारीपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबई : १ फेब्रुवारीपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी आवडीच्या वाहिन्यांची यादी केबल चालकांकडे कळवणे बंधनकारक आहे. १ फेब्रुवारीपूर्वी देशातील सुमारे ९० टक्के ग्राहक अशा प्रकारे अर्ज भरून देतील, असा विश्वास ट्रायतर्फे व्यक्त करण्यात आला.
केबल चालकांना १० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल हवा असल्याने त्यांनी या मागणीसाठी प्रयत्न सुरू ठेवले असून याबाबतचा निर्णय होईपर्यंत नियमावलीप्रमाणे ग्राहकांकडून अर्ज भरून घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे १ फेब्रुवारीपासून नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यावर ट्राय ठाम आहे. त्यामुळे या निर्णयाची नेमकी अंमलबजावणी कशी होणार याची उत्सुकता आहे.
ट्रायने गेल्या आठवड्यात देशातील ४० टक्के ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची यादी दिल्याचा दावा केला होता. ट्रायने वाहिन्यांची निवड करण्यासाठी साहाय्यभूत ठरण्यासाठी व वाहिन्यांचे दर जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या वेबसाइटला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या सर्व माध्यमातून देशातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक १ फेब्रुवारीपूर्वी अर्ज भरतील व या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
तरी निर्णयाची अंमलबजावणी होणार
१ फेब्रुवारीपूर्वी ९० टक्के ग्राहक आवडीच्या वाहिन्यांच्या यादीचा अर्ज भरून देतील. सुरुवातीला अत्यंत कमी असलेला हा वेग आता वाढला आहे. सुमारे दहा टक्के ग्राहक घराबाहेर असल्याने किंवा इतर कारणांमुळे हा अर्ज भरून देण्यात अयशस्वी ठरले तरी ९० टक्के ग्राहकांसहित या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी ट्रायतर्फे दररोज या कामाचा आढावा घेतला जात आहे..