पाकिस्तानी कायद्यानुसारच चालेल खटला
By admin | Published: May 21, 2017 01:07 AM2017-05-21T01:07:35+5:302017-05-21T01:07:35+5:30
कुलभूषण जाधव यांचा खटला पाकिस्तानी कायद्यानुसारच चालवून तार्किक निष्कर्षाप्रत नेला जाईल, असे प्रतिपादन पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी केले.
इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांचा खटला पाकिस्तानी कायद्यानुसारच चालवून तार्किक निष्कर्षाप्रत नेला जाईल, असे प्रतिपादन पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी केले.
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर चौधरी यांचे वक्तव्य आले आहे. ‘फ्रंटियर कॉर्प’च्या पासिंग आऊट परेडनिमित्त खान यांनी म्हटले की, पाकिस्तानात अराजकता आणि अशांती पसरविण्यासाठी काही लोक आमच्या शत्रूकडून पैसे घेत आहेत. जाधव हा एक भारतीय हेर आहे. तो पाकिस्तानविरोधातील काही गंभीर गुन्ह्यांत सामील होता. त्याला देशाच्या कायद्याने दोषी ठरविले आहे. याच कायद्यान्वये आणि देशाच्या घटनेच्या आधारे त्याचा खटला तार्किक निष्कर्षाप्रत नेला जाईल.
दरम्यान, जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळवून भारताने पाकिस्तानला धोबीपछाड दिल्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयातील युक्तिवादासाठी आपला वकील बदलला आहे. पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अश्तर औसफ अली हे आता पाकिस्तानच्या वतीने बाजू मांडतील. या आधी ही जबाबदारी ब्रिटनस्थित वकील खवार कुरेशी यांच्याकडे होती.
नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तान हरला, असे म्हणणे चूक आहे. न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली असली तरी त्यांना दूतावासाचा संपर्क देण्याची भारताची मागणी मान्य केलेली नाही. या खटल्यासाठी पाकिस्तान आणखी मजबूत टीम पाठविल.(वृत्तसंस्था)
जाधव हे कसाबपेक्षा खतरनाक -मुशर्रफ
- कुलभूषण जाधव हे मुंबई हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्यापेक्षाही खतरनाक आहेत, असे वक्तव्य पाकचे माजी लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ यांनी केले आहे.
- मुशर्रफ म्हणाले की, ‘‘जाधव यांनी हेरगिरी करून कसाबपेक्षा जास्त बळी घेतलेले असू शकतात. जाधव हे दहशतवाद भडकावण्याचे काम करत होते.
- मुशर्रफ यांच्या वक्तव्यामुळे भारतीयांनी समाजमाध्यमांतून त्यांच्यावर हल्ला चढविला आहे.