देशाचा जीडीपी दर 7.3 टक्के राहील, वर्ल्ड बँकेचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 09:12 AM2019-01-09T09:12:44+5:302019-01-09T10:30:02+5:30
आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारत जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश असेल, असे वर्ल्ड बँकनं जाहीर केलेल्या अहवालामध्ये मांडण्यात आले आहे. मंगळवारी (8 जानेवारी) वर्ल्ड बँकेकडून यासंबंधीचा अहवाल जारी करण्यात आला.
नवी दिल्ली - आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारत, जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश असेल, असे वर्ल्ड बँकनं जाहीर केलेल्या अहवालामध्ये मांडण्यात आले आहे. मंगळवारी (8 जानेवारी) वर्ल्ड बँकेकडून यासंबंधीचा अहवाल जारी करण्यात आला. या अहवालानुसार, सुरू असलेल्या आर्थिक वर्षादरम्यान (2018-19) भारताचा जीडीपी 7.3% दरानं वाढेल. भारताच्या तुलनेत चीनचा विकास दर 6.3% राहील, अशी आशा वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, 2018मध्ये चीनचा जीडीपी दर 6.5 टक्के एवढा होता.
वर्ल्ड बँक प्रॉस्पेक्ट्स ग्रुपचे संचालक अहान कोसे यांनी एका मुलाखतीत म्हटले की,''गुंतवणुकीतील वाढ आणि वाढत्या खपामुळे आम्हाला आशा आहे की आर्थिक वर्ष 2018-2019मध्ये भारताचा जीडीपी दर 7.3 टक्के एवढा राहील. तर 2019 आणि 2020 वर्षात यामध्ये वाढ होऊन जीडीपी दर 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. व्यवसायाच्या क्रमवारीत भारतानं वेगवान प्रगतीची नोंदणी केली आहे. भारत देश म्हणजे सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे''.
आगामी लोकसभा निवडणूक पाहता वर्ल्ड बँकेने सादर केलेला अहवाल म्हणजे मोदी सरकारसाठी आनंद देणारे वृत्त असल्याचे म्हटले जात आहे.
According to the World Bank, India's Gross Domestic Product (GDP) will grow at 7.3 per cent during the ongoing financial year (2018-19) pic.twitter.com/wA78fFGAjw
— ANI (@ANI) January 9, 2019
यंदाच्या आर्थिक वर्षात (2018-19) बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा वेग तुलनेनं मंदावणार आहे, असेही 'ग्लोबल इकोनॉमिक प्रॉस्पेक्ट्स : डार्कनिंग स्कायज'च्या अहवालात सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे, मोदी सरकारच्या जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचे वर्ल्ड बँकेकडून कौतुक करण्यात आले आहे. भारतात जीएसटी आणि नोटाबंदी लागू करण्याच्या निर्णयानं अनधिकृत क्षेत्रांना अधिकृत क्षेत्रांमध्ये बदलण्याचे काम केले आहे, असेही अहवालात म्हटले गेले आहे.