कृत्रिम बुद्धिमत्तेने टीआरपीची अचूक मोजणी शक्य; आयटी तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 07:52 AM2020-10-17T07:52:49+5:302020-10-17T07:53:05+5:30
कार्यक्रमांचे बनवा क्यू आर कोड; प्रेक्षकसंख्या व इतर बाबी समजतील
नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिर्फिशिअल इंटेलिजन्स) मदतीने टीआरपीची अचूक मोजणी करता येईल, असे माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
दूरचित्रवाहिन्यांना नेमका किती प्रेक्षकवर्ग लाभतो याची माहिती मिळविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे क्यू आर कोड तयार करता येतात. ते प्रेक्षकांना स्कॅन करून घेण्यास सांगावे. त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिसादावरून एखाद्या कार्यक्रमाला किती प्रेक्षकवर्ग लाभला याची संख्या कळू शकते. बनावट क्यू आर कोड शोधण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे सतत तपासणी करत राहिल्यास या प्रक्रियेतील घोटाळे सहज पकडता येतील, असेही आयटी तज्ज्ञांनी म्हटले आहे. वृत्तवाहिन्यांचा टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या वृत्तवाहिन्यांना दर आठवड्याला देण्यात येणाºया रेटिंगची प्रक्रिया तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बीएआरसी या संस्थेने स्थगित केली आहे. कोणते कार्यक्रम किती वेळ, किती लोकांनी पाहिले याची माहिती डीटीएच आॅपरेटरकडे असते. ती मिळवून त्याचे विश्लेषण केल्यासही आपल्याला प्रेक्षकसंख्या व इतर बाबींची उत्तरे मिळू शकतील. या सर्व बाबी बारकाईने तपासण्यासाठी सोय असल्याने त्या प्रक्रियेची विश्वासार्हताही अबाधित राहू शकते.
अचूक संख्या कळणार
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला कोरोना रुग्णांची संख्या व त्या साथीचा फैलाव याचीही अचूक माहिती मिळू शकते. एखाद्या भूभागात जंगलाचे क्षेत्र विस्तारते की आक्रसते आहे, याचाही अचूक तपशील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जीपीएस यंत्रणेच्या साहाय्याने मिळविता येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भविष्यात जगातील आणखी व्यवहार पार पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक देशाला दैनंदिन व्यवहारातही या तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार आहे, असे आयटीतज्ज्ञांनी म्हटले आहे.