बलात्कारी बाबा राम रहीमवर 2 हत्यांचा आरोप, जाणून घ्या बाबानं कशा केल्या होत्या या हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 01:23 PM2017-09-16T13:23:10+5:302017-09-16T14:28:27+5:30
दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमवर दोन हत्या केल्याचादेखील आरोप आहे.
चंदिगड, दि. 16 - दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमवर दोन हत्या केल्याचादेखील आरोप आहे. बलात्कारप्रकरणी बाबा राम रहीमला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवाण्यात आली आहे. बाबा राम रहीमवर पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा सच्चा सौदाचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येचा आरोप आहे. गेल्या 14 वर्षांपासून ही प्रकरणं कोर्टात सुरू आहेत.
या प्रकरणांबाबत जाणून घेऊया माहिती -
पहिले प्रकरण - पत्रकाराची हत्या
सिरसातील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून अनेकदा डेरा सच्चा सौदामध्ये होत असलेले अन्याय आणि अत्याचाराबाबत वृत्त छापत होते. डेरामध्ये सुरू असलेल्या लैंगिक शोषणाचा गौप्यस्फोटही सर्वप्रथम त्यांच्याच वृत्तापत्राद्वारे करण्यात आला होता.
त्यांच्या वृत्तपत्रानं एक अनामिक पत्रदेखील छापले होते. ज्यात सविस्तर माहिती देण्यात आली होती की, कशा प्रकारे सिरसा येथील डेराच्या मुख्यालयात महिलांवर अत्याचार केले जातात. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली होती आणि थेट राम रहीमवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. यानंतर ऑक्टोबर 2002मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळीबार करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला. यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यापासून ते आजपर्यंत रामचंद्र छत्रपती यांचा मुलगा वडिलांच्या मारेक-यांना शिक्षा व्हावी, यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे.
दुसरे प्रकरण - डेरा सच्चा सौदाचा माजी व्यवस्थापकाची हत्या
दुसरे प्रकरण डेरा सच्चा सौदाचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य रणजीत सिंह यांच्या हत्येशी संबंधित आहे. हे प्रकरण साध्वींवर झालेल्या बलात्कार प्रकरणाशी संबंधित आहे. रणजीत हा डेऱ्याच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य होता. तो राम रहीम यांच्या जवळचा असल्याने त्याला राम रहीम याचे सारे कारनामे माहीत होते. त्याची 10 जुलै 2003 मध्ये हत्या करण्यात आली होती. राम रहीम या प्रकरणातही आरोपी आहे. या दोन्ही हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम हा मुख्य सूत्रधाराच्या स्वरुपात सीबीआयनं म्हटले आहे. याप्रकरणी बाबा राम रहीमला शिक्षा व्हावी, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी कोर्टाकडे धाव घेतली. यानंतर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं नोव्हेंबर 2003 मध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. हत्या प्रकरणात सीबीआयनं 30 जुलै 2007 रोजी आरोपपत्र दाखल केले होते.
जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा
हत्येच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. यामुळे या प्रकरणाच्या सुनावणी संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुरमीत राम रहीम याला आज हत्येप्रकरणाची सुनावणी करण्यासाठी त्याला सीबीआयच्या कोर्टात हजर करण्याची शक्यता कमी आहे. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेलमध्येच होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बंदोबस्तात वाढ
हरियाणामधील पंचकुला येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. चकुला येथील सेक्टर एकमधील न्यायालयाच्या आवारात आणि आजूबाजूच्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी निमलष्करी दल आणि पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती हरियाणाचे पोलीस महासंचालक बीएस संधू यांनी दिली आहे. दरम्यान, गुरुमीत राम रहीम याच्यावरील बलात्कार प्रकारणाची सुनावणी करतेवेळी पंचकुला परिसरात त्याच्या एक लाखहून अधिक समर्थकांनी धुडगूस घातला होता.
तसेच, त्यांनी माध्यमांच्या ओबी व्हॅन्ससह इतर वाहनांची जाळपोळ केली होती. मात्र, आता या परिसरात एकही समर्थक याठिकाणी आला नसल्याची माहिती सुद्धा पोलीस महासंचालक बीएस संधू यांनी दिली.
सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम याला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 38 जण ठार झाले. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहे.