कारागृहात शशिकलांचा व्हीआयपी थाट, 2 कोटींची लाच दिल्याचा आरोप
By admin | Published: July 13, 2017 02:00 PM2017-07-13T14:00:47+5:302017-07-13T14:02:09+5:30
कारागृहाच्या उपमहानिरीक्षक डी रुपा यांनी अधिकारी कारागृहात बेकायदेशीर गोष्टी करण्यास परवानगी देत असल्याचा आरोप केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 13 - बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचं समोर आलं आहे. कारागृहाच्या उपमहानिरीक्षक डी रुपा यांनी अधिकारी कारागृहात बेकायदेशीर गोष्टी करण्यास परवानगी देत असल्याचा आरोप केला आहे. सोबतच शशिकला यांनाही विशेष वागणूक मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा
डी रुपा यांनी पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक आर के दत्ता तसंच कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांना पत्र लिहून हा खुलासा केला आहे. शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. तसंच स्टॅम्प पेप घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यालादेखील विशेष सुविधा मिळत असल्याचं डी रुपा यांनी पत्रातून सांगितलं आहे.
"कारागृहात नियमांचं होणारं उल्लंघन तुमच्या निदर्शनास आणून देत आहे. इतकंच नाही या सर्वांसाठी दोन कोटींचा लाच दिल्याचंही बोललं जात आहे. कृपया तुम्ही तात्काळ कारवाई करत, नियम मोडणा-यांना शिक्षा करावी", अशी विनंती रुपा यांनी पत्रातून केली आहे.
याशिवाय रुपा यांनी अन्य गंभीर आरोपही केले आहेत. 10 जुलै रोजी कारागृहातील 25 जणांची ड्रग टेस्ट करण्यात आली होती. यावेळी 18 जणांनी ड्रग्ज घेतल्याचं निष्पन्न झालं होतं. रुपा यांनी त्या सर्वांची यादीच पत्रात लिहिली आहे.
"कारागृहात कोणालाही व्हीआयपी वागणूनक दिली जात नाही आहे. जर डीआयजींना काही चुकीचं होताना आढळलं होतं, तर सर्वात आधी त्यांनी ते माझ्या निदर्शनास आणून द्यायला हवं होतं. अशाप्रकारे प्रसामाध्यमांकडे जाण्याची गरज नाही. मला अद्यापही त्यांचं पत्र मिळालेलं नाही", असं कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांनी सांगितलं आहे.
अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला याच कारागृहात असल्याने सर्वांचे विशेष लक्ष लागून आहे. याआधीही शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचं समोर आलं होतं. फक्त 31 दिवसांमध्ये 14 लोकांनी कारागृहात जाऊन शशिकला यांची भेट घेतली होती. नियमांनुसार शशिकला यांना इतक्या दिवसांमध्ये फक्त दोनच लोकांना भेटण्याची परवानगी होती. कारागृहात जाऊन शशिकलांची भेट घेतलेल्या 14 जणांचं नाव रजिस्टरमध्ये नोंद होतं. बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शशिकला यांनी 16 फेब्रुवारी रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केलं होतं, ज्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.