स्टायलिश मिशी ठेवल्याने दलित तरूणाला मारहाण केल्याचा आरोप; गुजरातमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 08:34 AM2017-09-29T08:34:16+5:302017-09-29T08:36:42+5:30
गुजरातमध्ये एका दलित तरूणाला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
अहमदाबाद- गुजरातमध्ये एका दलित तरूणाला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर काही लोकांनी एका दलित तरूणाला मारहाण केल्याचा आरोप केला जातो आहे. मारहाण झालेल्या मुलाने स्टायलिश मिशी ठेवली म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. गांधीनगरच्या कालोल तालुक्यात लिंबोदरा गावात राहणाऱ्या पीयुष परमार या 24 वर्षीय मुलाने त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. 25 सप्टेंबर रोजी काही जणांनी त्याला त्याने ठेवलेल्या मिशीवरून मारहाण केली. दरबार समुदायाच्या तीन जणांना मारहाण केल्याचं या मुलाने सांगितलं आहे. दलित समुदायातील मुलाने स्टायलिश मिशी ठेवल्याचं त्यांना पसंत न पडल्याने त्यांनी मारहाण केल्याचं या मुलाने सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मयूर सिंह वाघेला, राहुल विक्रम सिंह सेराठिया आणि अजित सिंह वाघेला या तीन जणांच्या विरोधात 26 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजून सुरू आहे. 'या प्रकरणात आरोपींनी तक्रारदार मुलाला शिवीगाळी, मारहाण करत अशी मिशी कशी ठेवू शकतो असा सवाल विचारला, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
जेव्हा मी रस्त्याने जात होते तेव्हा मला गोळ्यांचा आवाज ऐकु आला. रस्त्यावर अंधार असल्याने ती लोक कोण ? हे लांबून दिसत नव्हतं. ज्या ठिकाणाहून गोळ्यांचा आवाज आला तिथे आम्ही गेल्यावर आम्हाला दरबार समुदायाची तीन लोक दिसली. त्यावेळी तेथे भांडण होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. या सगळ्या प्रकारानंतर आम्ही घरी पोहचलो तेव्हा ती लोकही आमच्या मागे घरी आली आणि आम्हाला शिवीगाळ करायला लागली. त्यांनी आधी माझा चुलत भाऊ दिगांतला मारहाण केली आणि त्यानंतर मलाही मारहाण केली. दलित असून मिशी कशी ठेवू शकतो? हाच प्रश्न ते मारहाण करणारे मला सारखा विचारत होते, असं पीयुष परमार याने सांगितलं आहे.