Dhirendra Shastri : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारलं 30 लाखांचं आव्हान! म्हणाले- दरबारात या मग पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:21 IST2023-01-19T17:16:45+5:302023-01-19T17:21:56+5:30
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, आरोप करणारे लोक संकुचित मानसिकतेचे आहेत. आम्ही केवळ 7 दिवसांचीच कथा करतो. आम्ही आपली समस्या सोडवू, असा दावा कधीही करत नाही.

Dhirendra Shastri : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारलं 30 लाखांचं आव्हान! म्हणाले- दरबारात या मग पाहा...
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत नागपूरमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्यास आपण न्यायालयात जाऊ, असेही समितीचे श्याम मानव यांनी म्हटले आहे. यानंतर आता धीरेंद्र शास्त्री यांनीही पलटवार करत, 'मी आपले आव्हान स्वीकारतो. श्याम यांनी येथे रायपूरला यावे, तिकिटाचे पैसे मी देईन. आम्ही दिव्य दरबार लावला होतो, तेव्हा श्याम का आले नाही? ते आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले आहे.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, आरोप करणारे लोक संकुचित मानसिकतेचे आहेत. आम्ही केवळ 7 दिवसांचीच कथा करतो. आम्ही आपली समस्या सोडवू, असा दावा कधीही करत नाही. जे आमचे इष्ट आहेत, त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही अंधश्रद्धेच्या बाजूने नाही. आमचे इष्टच लोकांची समस्या दूर करतात. हनुमानजींची पूजा करणे आणि प्रचार करणे चुकीचे आहे का?
नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आरोप केला होता की, धिरेंद्र शास्त्री यांनी चमत्काराचे दावे करत कायद्याचे उल्लंघन केले आहे. यावर बोलताना धिरेंद्र शास्त्री म्हणाले, हे सर्व धर्मविरोधी लोक आहेत. एवढेच नाही, तर 'हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार,' असेही ते म्हणाले. तसेच आम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आलो आहोत की, आम्ही चमत्कार करत नाही आणि गुरुही नाही, अशेही त्यांनी म्हटले आहे.
शास्त्रींनी स्वीकारले 30 लाख रुपयांचे आव्हान -
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आव्हान देत, चमत्कार दाखवा, खरे ठरले तर आणि त्यांना 30 लाख रुपये देऊ. पण ते आव्हान स्वीकारण्यापूर्वीच 2 दिवस आधीच कथा संपवून निघून गेले. मात्र, धीरेंद्र शास्त्री यांनी श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारले आहे. याच बरोबर, धीरेंद्र कृष्ण यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली आहे.