उपसचिव आनंद जोशी यांना अटक स्वयंसेवी संस्थांवर दबाव आणल्याचा आरोप
By admin | Published: May 17, 2016 06:11 AM2016-05-17T06:11:23+5:302016-05-17T06:11:23+5:30
केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव आनंद जोशी यांना सोमवारी सीबीआयने अटक केली
नवी दिल्ली : आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी काही स्वयंसेवी संघटनांना विदेशी निधी नियमन कायद्यांतर्गत (एफसीआरए) नोटिसा पाठवणारे केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव आनंद जोशी यांना सोमवारी सीबीआयने अटक केली. त्यांना रविवारी ताब्यात घेत सीबीआयने त्यांची चौकशी सुरू केली होती. ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र त्यांच्या
पत्नीचा त्यांना नियमित भेटण्यास जात असल्याचा सुगावा
सीबीआयला लागला होता. त्यामुळे त्यांचा पाठलाग करून, दिल्लीच्या टिळक नगर भागातून आनंद
जोशी यांना ताब्यात घेण्यात आले होते.
तिस्ता सेटलवाड यांच्या सबरंग ट्रस्टसंबंधी फाईल चोरल्याचा तसेच ६० ते ७० स्वयंसेवी संस्थांना नोटिसा पाठवत दबाव आणून आर्थिक लाभ पदरात पाडून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पद्मश्री विजेत्या पर्यावरणतज्ज्ञ सुनीता नारायण
यांच्या सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्हायर्नमेंट (सीएसई) या स्वयंसेवी संस्थेला गेल्या नोव्हेंबरमध्ये नोटीस पाठवताना जोशी यांनी वरिष्ठांकडून परवानगी घेतली नव्हती. उपरोक्त कायद्याचा दाखला देत त्यांनी नारायण यांना विशिष्ट प्रश्नावलीही पाठविली होती.