'पोलिस राजकीय पक्षांची नावे घेण्यासाठी दबाव ...', संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींनी केले आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 07:59 PM2024-01-31T19:59:55+5:302024-01-31T20:02:57+5:30
मागील अधिवेशनात संसदेत दोन तरुणांनी घुसखोरी करत गोंधळ केला होता.
मागील अधिवेशनात संसदेत काही तरुणांनी घुसखोरी केली. या प्रकरणी त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहेय या प्रकरणी आता एक मोठी अपडेट आली आहे. या आरोपींनी बुधवारी न्यायालयात दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलवर गंभीर आरोप करत आरोपींनी न्यायालयात सांगितले की, गुन्ह्यांची कबुली देण्यासाठी आणि राजकीय पक्षांशी असलेले त्यांचे संबंध कबूल करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यासाठी आम्हाला विजेचे शॉक दिल्याचा आरोपही आरोपींनी केला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर आरोपींनी हा युक्तिवाद केला असून त्यांनी सहाही आरोपींची न्यायालयीन कोठडी १ मार्चपर्यंत वाढवली आहे. मनोरंजन डी, सागर शर्मा, ललित झा, अमोल शिंदे आणि महेश कुमावत या पाच आरोपींनी न्यायालयाला सांगितले की, त्यांना सुमारे ७० कोऱ्या कागदांवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणातील सहाव्या आरोपी नीलम आझाद वगळता सर्व आरोपींनी न्यायालयात सांगितले की,"आरोपींना छळ करण्यात आला आणि त्यांना यूएपीए अंतर्गत गुन्हा केल्याबद्दल आणि राष्ट्रीय राजकीय पक्षांशी संबंध असल्याबद्दल कबुलीजबाब देण्यासाठी त्यांना विजेचे शॉक देण्यात आले.
CM सोरेन यांना अटक होणार? DIG-IG सह मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने या प्रकरणी पोलिसांकडून उत्तर मागितले आणि अर्जावर सुनावणीसाठी १७ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली. तसेच अटक केलेल्या सहाही आरोपींना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रत्येक आरोपीला सुमारे ७० कोऱ्या पानांवर वेगवेगळ्या ठिकाणी सह्या करण्याची सक्ती करण्यात आली. आरोपींना युएपीए अंतर्गत गुन्ह्यांची कबुली देण्यासाठी आणि त्यांचे राष्ट्रीय राजकीय पक्षांशी संबंध असल्याबद्दल दबाव टाकण्यात आला/ विजेचे शॉक देण्यात आले. -पॉलीग्राफ/नार्को/ब्रेन मॅपिंग दरम्यान संबंधित व्यक्तींनी दोन आरोपींना त्यांच्या सहभागाबद्दल राजकीय पक्ष/नेत्याचे नाव देण्यासाठी दबाव आणला, असंही आरोपींनी म्हटले आहे.