कोलकात्यात भरदिवसा चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग; प्रवाशांची आरोपीला जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 10:08 PM2024-09-10T22:08:38+5:302024-09-10T22:08:47+5:30
कोलकात्यात भरदिवसा चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला प्रवाशांनी मारहाण केली
Kolkata Crime : कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या घटनेवरुन पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. अशातच एकीकडे कोलकात्यात महिला सुरक्षेबाबत हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. महिला प्रवाशांच्या विरोधानंतर लोकांनी आरोपीला पकडले. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिला अत्याचारासंदर्भात नुकताच कडक कायदा करण्यात आल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये अशा घटना थांबताना दिसत नाहीयेत.
आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येनंतर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला. मंगळवारी सकाळी कोलकाताच्या कसबा परिसरात एका सहप्रवाशाने एका महिलेचा विनयभंग केला. जेव्हा महिलेने बसमध्ये आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर प्रवाशांनी आरोपीला पकडून मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालत्या बसमध्ये आरोपीने एका महिलेचा विनयभंग केला. मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. यानंतर २५ वर्षीय महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. प्रवाशांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. आरोपीने लोकांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र लोकांनी धावत जाऊन आरोपीला पकडले. पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार घडला तेव्हा पीडित महिला कसब्याहून तिच्या फुलबागन येथील ऑफिसमध्ये जात होती.
धावत्या बसमध्ये पीडितेला अचानक जाणवले की कोणीतरी आपल्याला कोणीतरी चुकीचा स्पर्श करत आहे. प्रकरण नीट समजण्याआधीच त्या माणसाच्या वागण्याने छेडछाडीची पातळी गाठली होती. त्यानंतर महिलेने आरडाओरडा सुरू केला. आरोपी तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशांनी त्याला रंगेहाथ पकडून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर पीडिता घाबरली आहे. तिला आता रस्त्यावर जायला भीती वाटते, असे तिचा भावाने म्हटलं आहे. आरजी कार हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान चालत्या बसमध्ये विनयभंगाच्या घटनेने सुरक्षेवर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.