शरद पवार यांना थप्पड मारणारा आरोपी 8 वर्षे होता बेपत्ता; दिल्ली पोलिसांकडून पुन्हा अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 03:25 PM2019-11-13T15:25:30+5:302019-11-13T16:08:58+5:30
दिल्लीमध्ये ही घटना घडली होती. त्याला तेव्हाच ताब्यात घेण्यात आले होते.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रात किंगमेकर ठरलेले शरद पवार यांना 2011 मध्ये एका कार्यक्रमावेळी एका व्यक्तीने थप्पड लगावली होती. या व्यक्तीला तब्बल 8 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. अरविंदर सिंग याने पवारांना थप्पड लगावली होती.
दिल्लीमध्ये ही घटना घडली होती. त्याला तेव्हाच ताब्यात घेण्यात आले होते. खटल्यादरम्यान 2014 मध्ये त्याला दिल्लीच्या न्यायालयाने फरार घोषित केले होते. अरविंदरला हरविंदर या नावानेही ओळखले जाते. दिल्ली पोलिसांनी अरविंदरला अटक केल्यानंतर सुटकेचा श्वास घेतला आहे. कारण ते गेली 8 वर्षे आरोपीला शोधत होते.
वृत्तसंस्थेनुसार अटक केल्यानंतर तो कोठडीतून पळाला होता. शोधूनही न सापडल्याने त्याला दिल्लीच्या न्यायालयाने 2014 मध्ये फरारी घोषित करण्यात आले होते.
शरद पवार 2011 मध्ये कृषीमंत्री होते. दिल्लीतील इफ्कोच्या एका कार्यक्रमात त्यांच्याबाबत हा प्रकार घडला होता. आरोपी अरविंदर याने पवारांच्या गालावर थप्पड लगावली होती. पवार तेव्हा बाहेर पडत होते. अचानक झालेल्या हल्ल्याने शरद पवारही तोल गेल्याने खाली पडता पडता वाचले होते.
या हल्ल्यानंतर संसद मार्गावरील या ऑडिटोरियमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अरविंदरला पकडले होते आणि पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हल्लेखोर अरविंदर हा एक वाहतूकदार होता. पवार यांनी त्याच्या या कृत्याला भ्याडपणा म्हटले होते. तर अरविंदर याने हे सर्व भ्रष्ट असल्याने थप्पड मारण्यासाठी आल्याचे म्हटले होते.