अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याने ‘त्या’ जवानांची हत्या, बदला घेतल्याचा आरोपीचा कबुलीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:55 PM2023-04-19T12:55:00+5:302023-04-19T12:55:31+5:30
Bathinda Military Station: पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर चार जवानांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी जवान मोहन देसाई याला अटक केली आहे. आरोपीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. इतर मृत जवानांनी त्याच्याशी अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले होते
अमृतसर : पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर चार जवानांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी जवान मोहन देसाई याला अटक केली आहे. आरोपीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. इतर मृत जवानांनी त्याच्याशी अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले होते, त्यामुळे त्याने बदला म्हणून त्यांची हत्या केली, असे वरिष्ठ पोलिसांनी माहिती देताना सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीचा हेतू वैयक्तिक आहे. हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मोहन देसाईने त्यांना सांगितले की, मारले गेलेल्या चार जवानांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्याचा बदला म्हणून मी त्यांच्यावर गोळीबार केला.
हत्येसाठी अटक करण्यात आलेल्या लष्कराच्या जवानाने सुरुवातीला इतरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. कुर्ता पायजमा घातलेल्या दोनजणांना जवळच्या जंगलात पळून जाताना पाहिले होते, असा दावा त्याने केला होता. सतत चौकशी केल्यानंतर आरोपी जवानाने रायफल चोरण्यात आणि त्याच्या चार साथीदारांना ठार मारण्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. साथीदारांची हत्या केल्यानंतर हत्यार नाल्यात फेकले होते. लष्कराने सांगितले की, शस्त्रास्त्रे आणि अतिरिक्त दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. लष्कराने पुनरुच्चार केला की, या घटनेला कोणताही दहशतवादी अँगल नाही.