अचलकुमार ज्योती मुख्य निवडणूक आयुक्त

By Admin | Published: July 5, 2017 01:15 AM2017-07-05T01:15:16+5:302017-07-05T01:15:16+5:30

भारताचे २१वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राष्ट्रपतींनी अचल कुमार ज्योती यांची नियुक्ती केली आहे. ज्योती सध्या निवडणूक आयुक्त

Achalkumar Jyoti Chief Election Commissioner | अचलकुमार ज्योती मुख्य निवडणूक आयुक्त

अचलकुमार ज्योती मुख्य निवडणूक आयुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताचे २१वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राष्ट्रपतींनी अचल कुमार ज्योती यांची नियुक्ती केली आहे. ज्योती सध्या निवडणूक आयुक्त आहेत. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी सव्वादोन वर्षांचा कार्यकाळ संपवून बुधवारी निवृत्त झाल्यावर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ज्योती पदभार स्वीकारतील. येत्या दीड वर्षात आयोगावरील निवृत्त्यांमुळे मोदी सरकारला आयोगावर पसंतीचे तिन्ही नवे आयुक्त नेमण्यासाठी कोरी पाटी मिळेल. लोकसभेची आगामी निवडणूक पूर्णपणे नव्याने नेमलेला निवडणूक आयोग घेईल.
डॉ. झैदी आॅगस्ट २०१२पासून गेली सुमारे पाच वर्षे निवडणूक आयोगावर होते. एप्रिल २०१५मध्ये ते मुख्य निवडणूक आयुक्त झाले होते. आयोगाचे सदस्य व नंतर अध्यक्ष या नात्याने त्यांनी लोकसभेच्या दोन सार्वत्रिक निवडणुका व एक डझनाहून अधिक राज्य विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सांभाळली.
अचल कुमार ज्योती भारतीय प्रशासकीय सेवेचे १९७५च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्योती यांचे प्रशासकीय पातळीवर घनिष्ठ संबंध आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्योती सन २०१० ते २०१३ असे तीन वर्षे ते मुख्य सचिव होते. गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पही त्यांच्याच प्रमुखत्वाखाली साकार झाला. मोदी पंतप्रधान झाल्यावर मे २०१५मध्ये त्यांची निवडणूक आयुक्तपदी नेमणूक झाली. ज्योती पुढील वर्षी १७ जानेवारी रोजी निवृत्त होतील.

पुढील आयुक्त कोण?
लोकसभेची आगामी निवडणूक सन २०१९मध्ये होईल तेव्हा निवडणूक आयुक्त ज्योती व निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यापैकी कोणी आयोगावर नसतील. ज्योती जानेवारीत निवृत्त झाल्यावर रावत त्या पदावर जातील. तेही डिसेंबर २०१८मध्ये निवृत्त होतील. त्यामुळे मोदी सरकारला येत्या दीड वर्षात दोन नवे सदस्य नेमावे लागतील. त्यापैकी सर्वांत ज्येष्ठ आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्याचा पायंडा आहे. ज्योती यांच्या निवृत्तीनंतर ज्यांची आयुक्तपदी नेमणूक होईल, तेच रावत यांच्या निवृत्तीनंतर डिसेंबर २०१८मध्ये मुख्य आयुक्त होतील. त्यांच्या प्रमुखत्वाखाली पुढील लोकसभा निवडणूक होईल.

Web Title: Achalkumar Jyoti Chief Election Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.