'अच्छे दिन' वास्तवात कधीच नसतात; नितीन गडकरींचा युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 03:26 PM2018-03-10T15:26:27+5:302018-03-10T15:26:27+5:30
प्रत्येक माणूस हा असमाधानी असतो, त्यामुळे वास्तवात 'अच्छे दिन' कधीच नसतात.
नवी दिल्ली- सुख हे मानण्यावर असतं, या उक्तीच्या आधारे, 'अच्छे दिन' हे मानण्यावर असतात, असं 'लॉजिक' मांडत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोदी सरकारचा बचाव केला आहे. प्रत्येक माणूस हा असमाधानी असतो, त्यामुळे वास्तवात 'अच्छे दिन' कधीच नसतात, असा युक्तिवाद त्यांनी केला.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 'रोड टू २०१९ : स्पीड बम्प अहेड?' या विषयावरील चर्चासत्रात नितीन गडकरी सहभागी झाले होते. देशात 'अच्छे दिन' आले, असं भाजपा २०१९च्या प्रचारात ठामपणे म्हणू शकेल का?, असा प्रश्न विचारल्यानंतर गडकरींनी थोडा सावध पवित्रा घेतला.
'जो नगरसेवक असतो, त्याला आमदार व्हायचं असतं, आमदाराला खासदारकी खुणावत असते, खासदाराला मंत्री होण्याचं स्वप्न पडतं आणि मंत्र्यांना चांगल्या खात्याचं मंत्री व्हायचं असतं. ज्याच्याकडे मर्सिडीज असते तोही दुःखी असतो आणि बाइक असते तोही. अच्छे दिन हे मानण्यावर असतात. रोटी, कपडा और मकान म्हणजेच अच्छे दिन', असं जीवनाचं तत्वज्ञानच नितीन गडकरींनी सांगितलं. पंतप्रधान आवास योजनेतून घर बनत नाहीएत का?, सागरमाला प्रकल्पात १६ लाख कोटींची गुंतवणूक झालीय. हे अच्छे दिन नाहीत का?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. काँग्रेसने जे ५० वर्षांत केलं नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवलं. सगळ्या अपेक्षा पाच वर्षांत पूर्ण होऊही शकत नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.
२०१९ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचं काँग्रेसचं स्वप्न हे मुंगेरी लालच्या स्वप्नासारखंच आहे, असा टोला गडकरींनी लगावला. ईशान्य भारतातील निवडणुकीत त्यांची काय अवस्था झाली बघा, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.