हे यश क्रिकेटच्या विजयापेक्षाही मोठे
By admin | Published: September 25, 2014 04:03 AM2014-09-25T04:03:22+5:302014-09-25T04:06:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी भारताच्या ऐतिहासिक मंगळ मोहिमेच्या यशाचे साक्षीदार बनले़ इस्रोच्या नियंत्रण कक्षात अनेक शास्त्रज्ञांसोबत ते हजर होते़
बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी भारताच्या ऐतिहासिक मंगळ मोहिमेच्या यशाचे साक्षीदार बनले़ इस्रोच्या नियंत्रण कक्षात अनेक शास्त्रज्ञांसोबत ते हजर होते़ मंगळ यानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्र्षण कक्षेत प्रवेश करण्यापूर्वीच्या काही क्षणांची व्याकुळता, थरार असे सर्व त्यांनी अनुभवले़ मोहीम फत्ते झाल्याचे कळताच इस्रोच्या शास्त्रज्ञांशी हस्तांदोलन करून त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले़ यानंतर मंगळ मोहीम यशस्वी झाल्याचे त्यांनी जाहीर केले़
भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटची एखादी मालिका जिंकतो तेव्हा देशभर जल्लोष होतो़ आजचा हा विजय त्यापेक्षाही हजार पटींनी मोठा आहे़ त्यामुळेच संपूर्ण देशाने तेवढाच मोठा जल्लोष करायला पाहिजे़ आपल्या शास्त्रज्ञांनी आज जे यश गाठले त्याचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा, असे मोदी या वेळी म्हणाले़
मंगळ मोहिमेच्या यशासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे सांगत आजचा ऐतिहासिक क्षण संपूर्ण देशाचा ऊर अभिमानाने भरून यावा, असा असल्याचे मोदी या वेळी म्हणाले़ आपल्यासमोर अनेक अडचणी होत्या़ पण त्या पार करीत आपण पहिल्या प्रयत्नात हे यश गाठले़ आज एमओएम (मार्स आॅर्बिटर मिशन)चे मंगळाशी मिलन झाले़ मंगळाला ‘मॉम’ मिळाली़ ज्या मोहिमेचे नाव एमओएम अर्थात मॉम आहे, ते अपयशी ठरणे शक्यच नव्हते़ मॉम आपल्याला निराश करणार नाही, असा मला विश्वास होता, असे ते म्हणाले.