बाप्पाच्या स्वागतासाठी कळवणकर सज्ज
By admin | Published: September 5, 2016 12:09 AM2016-09-05T00:09:08+5:302016-09-05T00:36:44+5:30
आनंदाला उधाण : सभामंडप, सजावट व आरास उभारणी अंतिम टप्प्यात
कळवण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या आरासाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बाप्पांच्या स्वागतासाठी शहरातील गणेशमंडळे सज्ज झाली असून बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण आहे. विक्र ीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या गणेशमूर्तींनी गणेशभक्तांना भुरळ घातली असून अतिशय सुबक व मनोवेधक गणेशमूर्ती बाजारात विक्र ीला आल्या आहेत.
गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य विक्र ीचे स्टॉल्स शहरातील मेनरोड, बसस्थानक परिसर, महाराजा चौक, सुभाषपेठ आदि ठिकाणी थाटण्यात आले असून खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. दुसरीकडे शहरातील गणेश मंडळांकडूनही सभामंडपाची सजावट व आरास उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या सार्या कामांवर अखेरचा हात बाप्पाच्या आगमनापूर्वी पूर्ण होईल व बाप्पांचे उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याने स्वागतासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. घरोघरी बाप्पाची स्थापना केली जात असल्याने घरोघरी स्वागताची तयारी सुरू असून बाल गोपाळांची गल्लीबोळात, कॉलनी व आपल्या परिसरात बाप्पाची स्थापना करण्यासाठी बालगोपाळांमध्ये उत्साह व चैतन्याचे वातावरण आहे.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती -
पर्यावरणपूरक असणार्या शाडूमातीच्या गणेशमूर्तींना ग्राहकांकडून कमी मागणी असते. शाडूमाती सहज उपलब्ध होत नसल्याने तिच्या गणेशमूर्ती प्रचंड महाग असतात. याशिवाय या मूर्तींवर केलेली रंगांची कलाकुसर पीओपीच्या मूर्तींसारखी मोहक नसते, म्हणूनच ग्राहक त्यांना पसंती देत नाहीत. पर्यावरणाच्या दृष्टीने शाडूमातीचे महत्त्व पटवून दिल्यानंतर १० जणांपैकी एक ग्राहक ही मूर्ती घेण्यास राजी होतो, अशी माहिती मूर्ती विक्र ेत्यांनी दिली.
आकर्षक सजावट साहित्य -
आकर्षक सजावटीशिवाय गणेशाची स्थापना कशी होऊ शकते? म्हणूनच बाजारात गणेशमूर्तींसोबतच आकर्षक सजावट साहित्य व पूजेचे साहित्यदेखील उपलब्ध झाले आहे. रंगीत पडदे, पताके, डोक्याला बांधण्यासाठीच्या भगव्या प्य़ा, मूर्तीच्या मागे फिरणारे स्वयंचलित चक्र , तोरण व रंगीबेरंगी चेंडू, फुले व पानांच्या माळा असे साहित्य १०० ते ५०० रु पयांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच श्रीफळ, अगरबत्ती, धूप, कुंकू, दुर्वा, कापूर व आसन असे पूजेसाठी लागणारे साहित्यदेखील बाजारात उपलब्ध आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी गणेशमूर्ती व पूजेच्या साहित्याची दुकाने एकाच ठिकाणी लावली आहेत.
मंडप व आरास उभारणीला वेग
कळवण शहरात बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश मित्रमंडळाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मंडप व आरास उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून यावर्षी मंडपाच्या साहित्याच्या दरामध्ये किरकोळ वाढ झालेली आहे. पूर्वी कळवण शहरातील गणेशोत्सव भाविकांसाठी मोठे आकर्षण होते; मात्र आता मोठ्या मंडळांची संख्या कमी झालेली आहे; मात्र जी मोठी मंडळे ती दरवर्षी समाजप्रबोधनावर आरास सादर करून आपली सांस्कृतिक परंपरा जोपासत आहेत. गणेशोत्सवानिमित्त मंडप उभारणीचे काम मंडपवाल्यांनाच संपूर्ण कॉण्ट्रॅक्ट देण्याची पद्धत रूढ झाली आहे. सर्व साहित्य मंडपवाल्याकडूनच उपलब्ध होत असल्याने, मंडळाच्या कार्यकर्त्यांना फक्त मूर्ती विराजमान करण्याचे काम आता करावे लागते. मंडपाला लागणारे सेंटरिंग साहित्य, पत्रा, ताडपत्री, याचे दर किरकोळ वाढले आहे. तर मंडपात लागणारी लाईिटंग, फोकस याचे दर वाढले आहेत. त्यामुळे एलईडी लायटिंगला तसेच एलईडी फोकसला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, तर मंडपाच्या साहित्य दरामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सावता डेकोरेटर्सचे संचालक भगवान निकुंभ यांनी सांगितले.
बाजारपेठ भक्तिमय
घरोघरी बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर घरातील सजावटीसाठी नवीन फॅन्सी वस्तू घेण्याकडे कळवणकरांचा कल असून अलीकडे कमी किमतीत फॅन्सी वस्तू मिळत असल्यामुळे एका वर्षी वापरून पुन्हा पुढील वर्षी नवीन वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. वस्तूंच्या कमी किमतीमुळे अनेकांना ते परवडणारे असते. इलेक्ट्रॉनिक वस्तू, विविध भजने, आरती कॅसेट व विविध सजावटीची दुकाने, थर्माकोल दुकाने सजली आहेत. बाप्पाच्या आगमनामुळे बाजारपेठेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज
कळवण शहरात मानाचे समजले जाणारे महाराजा कला, क्र ीडा, सांस्कृतिक मित्रमंडळ, गणेशनगर मित्र मंडळ, कळवणचा राजा युनायटेड, कौतिक महाराज कला, क्र ीडा मंडळ, श्रीकृष्ण मित्रमंडळ, कृष्णा फ्रेंड्स सर्कल, छत्रपती बाबा ग्रुप,ओम गणेश मित्रमंडळ, गांधी चौक मित्रमंडळ, लोकमान्य मित्रमंडळ ,आयर्न मित्रमंडळ, गोल्डन ग्रुप, जय विजय, कळवण आदर्श सोशल ग्रुप, बाबाजी मित्रमंडळ, राजे शाहू , शिवाजीनगर मित्रमंडळ, शिवसाम्राज्य मंडळ, महामंङलेश्वर मित्रमंङळ, साई सरकार, संभाजीनगर, ओम ग्रुप, शिवराष्ट्र प्रतिष्ठान, स्वाभिमानी, मोठादेव महाराज, हिंदवी स्वराज्य, शिवराज्य, राजगर्जना, छत्रपती फ्रेंड्स सर्कल, प्रिन्स ग्रुप आदि कळवण शहरातील गणेशमंडळे बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत.