मतपत्रिकेवर क्रॉस मार्क केल्याची निवडणूक अधिकाऱ्याची कबुली; सुप्रीम कोर्टात काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 05:03 PM2024-02-19T17:03:17+5:302024-02-19T17:06:25+5:30
सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना काही प्रश्न विचारत फटकारल्याचं पाहायला मिळालं.
Supreme Court ( Marathi News ) : चंदीगड महापौरपदाची निवडणूक देशभर चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने घोळ घालत भाजप उमेदवाराला जिंकण्यासाठी मदत केल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि काँग्रेसकडून करण्यात आला होता. तसंच याप्रकरणी सुप्रीम कोर्टातही धाव घेण्यात आली होती. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना काही प्रश्न विचारत फटकारल्याचं पाहायला मिळालं.
आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. या प्रश्नांची खरीखुरी उत्तरे द्या, आम्ही तुमचा व्हिडिओही बघितला आहे, अशा शब्दांत फटकारत सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना प्रश्न विचारले. मतमोजणीवेळी तुम्ही काही बॅलेट पेपर्सवर क्रॉस मार्क केलं होतं की नाही? असा प्रश्न सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने अनिल मसीह यांना विचारला. त्यावर मसीह यांनी म्हटलं की, हो मी असं मार्क केलं होतं. मात्र त्यापूर्वी काही उमेदवारांनी या मतपत्रिकेत छेडछाड केली होती. अशा मतपत्रिका लक्षात याव्यात, यासाठी मी तो मार्क केला होता.
दरम्यान, "निवडणुकांमध्ये होत असलेल्या घोडेबाजाराबाबत आम्ही चिंतेत आहोत. हा खूप गंभीर प्रकार आहे. ज्या मतपत्रिकेवर निवडणूक अधिकाऱ्याने क्रॉस मार्क केला आहे त्या उद्या आम्हाला दाखवा," अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. याप्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
महापौरांचा राजीनामा
सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीपूर्वी काही तास आधीच चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंदीगड महानगरपालिकेमध्ये भाजपने मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. चंदीगड महानगरपालिकेतील आपचे ३ नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. नेहा मुसावट, गुरचरण काला आणि पूनम देवी यांनी चंदीगडमधील भाजपचे निवडणूक प्रभारी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या तिघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, ३० जानेवारी रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोज सोनकर यांनी आम आदमी पक्षाच्या कुलदीप कुमार यांना पराभूत केले होते. सोनकर यांना १६ तर कुमार १२ मतं मिळाली होती. तर ८ मतं ही बाद ठरवण्यात आली होती. या बाद ठरवण्यात आलेल्या मतांवरून मोठा वाद निर्माण झाला होता.