"मी तुझा भाऊ आहे, खाली ये", रक्षाबंधनाच्या दिवशी अधिकाऱ्याने 'असा' वाचवला मुलीचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 11:31 AM2023-09-01T11:31:17+5:302023-09-01T11:32:55+5:30
इमारतीच्या वर चढलेली मुलगी जोरजोरात ओरडू लागली, त्यानंतर लोकांचे लक्ष तिच्याकडे गेले.
यूपीच्या गाझियाबादमध्ये वडिलांवर नाराज होऊन दहावीत शिकणाऱ्या एका मुलीने छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी घटनास्थळी पोहोचलेले एसीपी स्वतंत्र कुमार सिंह यांनी आपल्या प्रसंगावधान राखून मुलीचा जीव वाचवला आहे. इंदिरापुरम पोलीस स्टेशन हद्दीतील अभय खंड भागात ही घटना घडली आहे, दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने वडिलांवर नाराज होऊन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
इमारतीच्या वर चढलेली मुलगी जोरजोरात ओरडू लागली, त्यानंतर लोकांचे लक्ष तिच्याकडे गेले. आत्महत्या करत असल्याचं पाहून लोकांमध्ये खळबळ उडाली. लोकांनी घाईघाईने पोलिसांना घटनास्थळी बोलावलं आणि तासभर हे नाट्य सुरूच राहिलं. मोठ्या कष्टाने, स्थानिक पोलीस आणि एरियाचे एसीपी स्वतंत्र कुमार यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नानंतर मुलीने खाली येण्यास होकार दिला.
रक्षाबंधन असल्याने परिसरातील एसीपी स्वतंत्र कुमार सिंह यांनी मुलीला प्रेमाने समजावून सांगण्यास सुरुवात केली. चौथ्या मजल्यावरच्या टेरेसवर उभ्या असलेल्या विद्यार्थिनीला त्यांनी 'आज रक्षाबंधनाचा दिवस आहे, मी तुझा भाऊ आहे, खाली ये आणि मला राखी बांध, मी तुला साथ देईन', असे सांगितले. यावेळी चिडलेल्या मुलीने अधिकाऱ्याशी बोलत राहून आपली समस्या सांगण्यास सुरुवात केली. मात्र, काही वेळानंतर अधिकाऱ्याने समजावून सांगितल्यानंतर तिने खाली येण्यास होकार दिला.
ही विद्यार्थिनी अभय खांड परिसरात राहते आणि ट्यूशनला जाण्यावरून वाद झाला असता तिचे वडील तिला ओरडले. या गोष्टीचा तिला खूप राग आला आणि म्हणाली की, तुम्ही मला नेहमी ओरडता. या मुलीच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं त्यामुळे ती अस्वस्थ होती. तिच्या वडिलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यावरून तिला फटकारलं, त्यामुळे तिने रागाच्या भरात चार मजली इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.