लोकमतच्या वृत्तामुळे भार्इंदरमध्ये फलक झाकण्याची कारवाई
By admin | Published: September 25, 2014 01:17 AM2014-09-25T01:17:55+5:302014-09-25T01:17:55+5:30
ऐन निवडणुकीच्या काळात शहरात आचारसंहितेला पायदळी तुडवण्याचा पराक्रम काही स्वयंभू (राजकीय पदाधिकारी) दादा बिनदिक्कतपणे करीत आहेत.
भार्इंदर : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही शहरभर राजकीय फलक, कोनशिला व नगरसेवकांच्या वाहनांवर त्यांच्या पदाचे स्टीकर लावल्याचे वृत्त लोकमतध्ये प्रसिद्ध होताच याची दखल घेऊन आचारसंहितेवर वॉच ठेवणा-या विभागाने उघडे राजकीय फलक व नगरसेवकांच्या वाहनांवरील स्टीकर झाकण्याच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात शहरात आचारसंहितेला पायदळी तुडवण्याचा पराक्रम काही स्वयंभू (राजकीय पदाधिकारी) दादा बिनदिक्कतपणे करीत आहेत. हे दादा राजकीय पक्षांच्या नावासह आपापल्या पदांच्या पाट्या वाहनांवर लावून सर्रास मिरवत असल्याचे जागोजागी पाहावयास मिळत आहे. तसेच काही लोकप्रतिनिधींनीही आपली ओळख आचारसंहितेतही कायम राहण्याच्या उद्देशाने स्ववाहनांसह आप्तस्वकीयांच्या वाहनांवर नगरसेवकपदाचे स्टीकर लावून शहरभर फिरवत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा प्रकार स्थानिक पोलिसांसह निवडणूक प्रशासन नजरेआड करीत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यावर त्यावर पालिका आयुक्त सुभाष लाखे यांनी बुधवारी मीरा-भार्इंदर मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले नियंत्रण अधिकारी (आचारसंहिता) डॉ. संभाजीराव पानपट्टे यांना संपर्क साधून उघडे असलेले फलक त्वरित झाकण्यासह लोकप्रतिनिधींना त्यांच्या वाहनांवरील स्टीकर काढण्याची सूचना देऊन कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)