मीडिया ट्रायल केल्यास होऊ शकते कारवाई, हायकोर्टाने केंद्र सरकारलाही फटकारले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 02:00 AM2021-01-19T02:00:00+5:302021-01-19T06:58:13+5:30

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात प्रसारमाध्यमांकडून होत असलेल्या मीडिया ट्रायलप्रकरणी उच्च न्यायालयात काही जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सोमवारी निकाल दिला.

Action may be taken if media trial The High Court also slammed the central government | मीडिया ट्रायल केल्यास होऊ शकते कारवाई, हायकोर्टाने केंद्र सरकारलाही फटकारले 

मीडिया ट्रायल केल्यास होऊ शकते कारवाई, हायकोर्टाने केंद्र सरकारलाही फटकारले 

Next

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात प्रसारमाध्यमांकडून आक्षेपार्ह व अतिरंजित वार्तांकन होत असताना केंद्र सरकारने त्यांच्यावर वचक ठेवण्याऐवजी त्याकडे डोळेझाक केली, अशा शब्दांत हायकोर्टाने केंद्राला खडेबोल सुनावले, तर दुसरीकडे वृत्तवाहिन्यांनाही धारेवर धरले. अशा प्रकरणाच्या वार्तांकनाचा तपासावर परिणाम होताे. तपासात हस्तक्षेपाचा प्रयत्न केल्यास कोर्टाचा अवमान कायद्याखाली कारवाई होऊ शकते, असा निर्णयही न्यायालयाने दिला.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात प्रसारमाध्यमांकडून होत असलेल्या मीडिया ट्रायलप्रकरणी उच्च न्यायालयात काही जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सोमवारी निकाल दिला.

या प्रकरणी रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊलाही न्यायालयाने फटकारले. या दोन्ही वृत्तवाहिन्यांकडे करण्यात आलेले वृत्तांकन प्राथमिकदृष्ट्या अवमानकारक असल्याचे न्यायालयाने म्हटले. मात्र, त्याविषयी कारवाई करण्याचे निर्देश देण्यास आम्ही तूर्त टाळत आहोत, असे उच्च न्यायालयाने म्हटले. वृत्तवाहिन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या कोणतीही वैधानिक यंत्रणा नाही. वृत्तवाहिन्यांच्या संघटनेने केलेल्या प्राधिकरणाला वैधानिक अधिष्ठान नाही, असे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदविले. सध्या वृत्तवाहिन्यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया कायद्यातील पालन करावे. माध्यमांनी आपल्या सीमा ओलांडू नये, असे आदेश न्यायालयाने दिले. 

एखादी व्यक्ती दोषी ठरेपर्यंत निर्दोष असते, असे कायद्याने मानले आहे. मात्र, माध्यमांकडून याचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे. माध्यमे स्वतःच खटला चालवून वातावरण गढूळ करत आहेत, अशा शब्दांत न्यायालयाने माध्यमांना फटकारले.

या प्रकरणी झालेली मीडिया ट्रायल केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (रेग्युलेशन) ॲक्टच्या विसंगत होती, असे म्हणत न्यायालयाने आत्महत्यांच्या प्रकरणात वार्तांकन करताना वृत्तवाहिन्या आणि मुद्रितमाध्यमांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली. 

तपास यंत्रणांनी गुप्तता राखावी
सुरू असलेल्या तपासाबाबत तपास यंत्रणांनीही गुप्तता राखावी. त्यांच्यासाठी ते बंधनकारक आहे, असे न्यायालयाने म्हटले.  नाेव्हेंबर महिन्यात न्यायालयाने याचिकाकर्ते, प्रसारमाध्यमे, मुंबई पोलीस, केंद्र सरकार या सर्वांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्व याचिकांवरील निकाल राखून ठेवला होता.

प्रसारमाध्यमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
- चर्चेच्या कार्यक्रमांचे आयोजन करताना त्यात कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्यहनन करू नये.
-  गुन्ह्यातील पीडित व्यक्ती, साक्षीदार यांच्या मुलाखती घेऊन गुन्ह्याच्या घटनेचे विश्लेषण करू नये.
- आरोपींचे फोटो प्रसिद्ध करू नये.
- गुन्ह्याच्या घटनेचे नाट्य रूपांतर मांडू नये.
- तपासातील संवेदनशील माहिती प्रसिद्ध करू नये.

Web Title: Action may be taken if media trial The High Court also slammed the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.