‘ती’ कृती पक्षाच्या पथ्यावर नाही?
By admin | Published: January 20, 2017 04:50 AM2017-01-20T04:50:40+5:302017-01-20T04:50:40+5:30
नोटाबंदीच्या मुद्यावरून एकीकडे काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत
व्यंकटेश केसरी,
नवी दिल्ली- नोटाबंदीच्या मुद्यावरून एकीकडे काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत तसेच ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची मागणीही करीत आहेत, तर संसदीय समितीपुढे ऊर्जित पटेल यांची कोंडी झाली असताना माजी पंतप्रधान मनमोहनसिंग त्यांच्या बचावासाठी पुढे आले. ही कृती पक्षाच्या पथ्यावर पडणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे.
या मुद्यावर अखिल भारतीय काँगे्रस समितीनेही मौन बाळगले आहे, तर याच मुद्यावरून दुसऱ्या दिवशी काँग्रेसचा आक्रमकपणाही कमी झाला आहे. डॉ. मनमोहनसिंग म्हणजे काँग्रेसचा विश्वासार्ह चेहरा आहे. नोटांबदीचा जीडीपीवर होणारा परिणाम, रोजगारात होणारी घट, संसदेच्या आत आणि बाहेरही याबाबत उठविलेला आवाज. नोटाबंदीनंतरचा सर्वात वाईट काळ आणखी येणार आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले होते. पैसे काढण्यावरील निर्बंध केव्हा उठविणार? यासारख्या प्रश्नांची सरबत्ती ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केली. तेव्हा मनमोहनसिंग यांनी ऊर्जित पटेल यांना असा सल्ला दिला की, नव्या अडचणी उभ्या राहतील अशा प्रश्नांना उत्तरे देऊ नका. आपण अशा प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही. स्थायी समितीचे अध्यक्ष एम. वीरप्पा मोईली हेही दडपणाखाली आल्याने त्यांचीही टोकदार प्रश्न विचारून ऊर्जित पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अडचणीत आणण्याची इच्छा झाली नाही. सरचिटणीस गुलाम नबी आझाद काँग्रेसच्या व्यासपीठावरून विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांतील जनतेला भाजपविरुद्ध मतदान करण्याचे आवाहन करीत असताना या मुद्यांवरून काँग्रेस नेत्यांत मतभेद निर्माण झाले.