मोठ्या देशांना विश्वासात घेऊनच पाकमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:25 AM2019-02-27T05:25:55+5:302019-02-27T05:26:05+5:30
विजय गोखलेंवर होती जबाबदारी हवाई हल्ल्यानंतर सर्वांना दिली माहिती
संतोष ठाकूर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या खैबरपख्तूनस्थित बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक-२ करायच्या आधी भारताने जगातील जवळपास सगळ्या देशांना अशा प्रकारच्या कारवाईचे संकेत देत त्यांना विश्वासात घेतले होते. ही जबाबदारी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी स्वत: सांभाळली होती. याच कारणामुळे कारवाईनंतर परराष्ट्र मंत्रालयाने जगातील सगळ्या देशांना या कारवाईचे सविस्तर विवरण दिले.
नवी दिल्लीतील सर्व प्रमुख देशांचे राजदूत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी एअर स्ट्राइकची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने म्हटले की, जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) पुलवामा हल्ल्याची निंदा केली, तेव्हाच आमच्या कारवाईला जगाचा पाठिंबा मिळाला होता. यूएनएससीने आपल्या संदेशात जगातील प्रत्येक देशाला पुलवामा हल्ल्याचा कट रचणाºया जैश-ए-मोहम्मदविरुद्धच्या कारवाईत भारताला सक्रिय मदत करावी, असे आवाहन निवेदनात केले होते. पाकिस्तानचा मित्र चीननेदेखील यूएनएससीच्या निवेदनावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतरच भारताने एअर स्ट्राइकसाठी जगातील सगळ्या देशांना विश्वासात घ्यायला सुरुवात केली होती. या निवेदनावरून आमच्या हे लक्षात आले की, पाकिस्तानच्या दहशतवादामुळे जगही त्रासून गेले आहे आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची हीच वेळ आहे.
पाकची विनंती गेली वाया
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कसुरी यांनी संयुक्तराष्ट्रांच्या सचिवांना पत्र लिहून म्हटले होते की, पुलवामा हल्ल्यानंतर भारत आमच्या देशावर हल्ल्याची तयारी करीत आहे, त्याला थांबवावे. या पत्रावर संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल केला, तसेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे तळ पाकिस्तानने स्वत: नष्ट करावेत, असेही सांगण्यात आले. जगालाही दहशतवाद्यांचे तळ नष्ट व्हावेत, असे वाटते, हा आमच्यासाठी शुभसंकेत होता. त्यानंतर, आम्ही जगाला विश्वासात घेऊन एअर स्ट्राइकची तयारी सुरू केली, असे हा अधिकारी म्हणाला.