‘स्टार्ट-अप इंडिया’चा कृती आराखडा १६ जानेवारीला सादर करणार
By Admin | Published: December 27, 2015 11:00 PM2015-12-27T23:00:21+5:302015-12-27T23:00:21+5:30
देशातील युवकांसाठी असलेल्या आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारच्या ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’चा कृती आराखडा येत्या १६ जानेवारीला सादर करण्यात येईल
नवी दिल्ली : देशातील युवकांसाठी असलेल्या आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारच्या ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’चा कृती आराखडा येत्या १६ जानेवारीला सादर करण्यात येईल आणि राज्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये या मोहिमेचा प्रचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी बोलत होते. युवकांसाठी असलेली ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’ ही योजना गरीब आणि युवकांसाठी नव्या संधी घेऊन येईल. हे कसे घडेल? काय घडेल? काय होईल? याबाबतची एक कृती योजना तुमच्यासमोर मांडण्यात येईल. देशभरातील आयआयटी, आयआयएम, सर्व केंद्रीय विद्यालये, एनआयटी आणि जेथे जेथे युवा पिढी आहे त्या सर्वांना थेट संपर्काद्वारे या कार्यक्रमाशी जोडले जाईल, असे मोदी म्हणाले. स्टार्ट-अपबाबत आपल्याकडे एक समज आहे. जसे डिजिटल जग असो वा आयटी व्यवसाय, हा स्टार्ट-अप त्या लोकांसाठीच आहे, असे मानले जाते; पण तसे नाही. आम्हाला त्यात भारताच्या गरजांनुसार बदल करावयाचा आहे. गरीब माणूस कुठेतरी मोलमजुरी करतो. त्याला शारीरिक श्रम करावे लागतात; परंतु युवकांनी अशी एखादी वस्तू तयार करावी, की ज्यामुळे या गरिबाला मजुरी करताना थोडा दिलासा मिळेल. मी त्यालाच स्टार्ट असे मानतो, असे त्यांनी सांगितले. भारत स्टार्ट-अप राजधानी बनू शकतो काय? आमच्या राज्यांमध्ये युवकांसाठी रोजगाराची संधी म्हणून नवनवे स्टार्ट, बांधकाम क्षेत्र, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र आदींमध्ये नवनवे उपक्रम सुरू केले जाऊ शकतात काय, असा सवाल करून मोदी पुढे म्हणाले, प्रत्येक गोष्टीत नावीन्य, नवीन पद्धत, नवा विचार असावा. जग नव्या उपक्रमांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया युवा पिढीसाठी एक फार मोठी संधी घेऊन आलेला आहे. युवकांना मदत करा, असे मी बँकांना सांगणार. हिमतीने पुढे जा, असे युवकांनाही सांगणार. मार्केट मिळेलच. भारतातील प्रत्येक युवकाकडे प्रतिभा आहे. त्यांना फक्त संधी हवी आहे.
> अपंगांसाठी ‘दिव्यांग’ शब्द वापरण्याचा सल्ला
शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्ती स्वत:मध्ये फार सक्षम असतात आणि त्यांचे कार्यकर्तृत्व आश्चर्यचकित करणारे असते. हे कार्यकर्तृत्व पाहून त्यांच्यात दिव्य शक्ती असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे अशा अपंग व्यक्तींसाठी ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग करणे उचित ठरू शकेल, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली.