निवडणुकीनंतर शत्रुघ्न सिन्हांवर कारवाई, वेगळे होण्याची शॉटगनचीही तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:59 AM2017-12-08T02:59:14+5:302017-12-08T11:13:47+5:30
चित्रपट अभिनेते आणि भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा पक्षावर टीका केल्यामुळे भाजपा नेतृत्व नाराज असून, गुजरात व हिमाचलच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होेणार असल्याचे समजते.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते आणि भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा पक्षावर टीका केल्यामुळे भाजपा नेतृत्व नाराज असून, गुजरात व हिमाचलच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होेणार असल्याचे समजते.
शत्रुघ्न सिन्हा नेहमीच भाजपावर टीका करत असतात. आता त्यांचा आवाज आणखी तीव्र झाल्याने या ‘आवाजावर’ कारवाई करणे भाजपाला भाग पडत आहे.
केंद्र सरकारमधील मंंत्री निवडणुका व निवडणूक आयोगाची देखभाल करण्यासाठी गुजरातमध्ये बसले आहेत काय? दिल्लीला घर वापसी कधी आहे? देशाचीही काळजी घ्या, घरवापसी लवकर होईल, अशी अपेक्षा आहे, असे ते अलीकडेच म्हणाले. संसदेचे अधिवेशन उशिराने १५ डिसेंबरपासून सुरू होत असल्याबद्दलही सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली होती.
पूर्ण केंद्र सरकार विजयासाठी गुजरातमध्ये बसले आहे. ईव्हीएममध्ये काही बिघाड तर नाही ना, अशी त्यामुळे काळजी घ्यायला हवी. याच मुद्द्यावरून आपल्याला दोष दिला जात आहे, पक्षाच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचविले जात आहे, असेही ते म्हणाले. गुजरातमध्ये भाजपा ‘वीक विकेट’वर असल्याचा उल्लेख त्यांनी केला. जिग्नेश, अल्पेश आणि हार्दिक यांना काँग्रेसचे एजंट असल्याचे आपले लोक सांगत फिरत आहेत. ही ‘आंबट द्राक्षां’ची परिपूर्ती तर नाही ना?, असेही त्यांनी म्हटले आहे. अच्छे दिनविषयी बोलण्याची हीच वेळ योग्य आहे, असे आपणास वाटत नाही का, असा सावल करून सिन्हा यांनी २0१२ निवडणुकीत गुजरातमध्ये ५० लाख घरे उभारण्याची घोषणा केली होती, याचीही आठवण करून दिली आहे. यापूर्वीही सिन्हा यांनी पक्षाच्या निर्णयांच्या विरोधात उघडउघड टीका केली होती. पक्षनिर्णयाविरोधात आवाज उठवणारे यशवंत सिन्हा यांनाही पाठिंबा दिला होता.
मानसिक तयारी आहेच!
अर्थात शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपापासून वेगळे होण्याची मानसिक तयारी केल्याचे समजते. पक्ष आपल्याला कधी काढून टाकेल किंवा निलंबित करेल, याची ते वाट पाहत आहेत. कीर्ती आझाद यांनाही भाजपाने यापूर्वी निलंबित केले आहे.